रंगमंच कामगारांना ‘किवी’चा मदतीचा हात; नाट्यसंस्थेची सामाजिक बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 03:00 PM2021-05-11T15:00:32+5:302021-05-11T15:00:54+5:30
नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण दळवी आणि ज्येष्ठ रंगकर्मी विलास गुर्जर यांनी ही मदत या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली.
- राज चिंचणकर
मुंबई : गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात होरपळलेल्या रंगभूमीवरील बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना काही संस्था व व्यक्तींनी साहाय्य केले. यावर्षी तरी सर्वकाही सुरळीत होईल अशी सर्वांना आशा असतानाच, यंदाही लॉकडाऊन लागले आणि या कामगारांची पुन्हा तीच स्थिती झाली. अशावेळी ‘किवी प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने सामाजिक बांधीलकीतून पुढाकार घेत त्यांच्या नाटकांच्या बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
‘वाहतो ही दूर्वांची जुडी’, ‘अपराध मीच केला’, ‘करायला गेलो एक’, ‘बी प्रॅक्टिकल’ आदी नाटकांचे प्रयोग उत्तम नटसंचात रंगभूमीवर सादर करणारी नाट्यसंस्था म्हणून ‘किवी प्रॉडक्शन्स’ची ओळख आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा थांबले आहेत. त्यामुळे पूर्णतः नाट्य व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ व रंगमंच कामगार यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘किवी प्रॉडक्शन्स’चे निर्माते किशोर सावंत व विवेक नाईक यांनी पदरमोड करीत, त्यांच्या १४ बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात दिला. या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण दळवी आणि ज्येष्ठ रंगकर्मी विलास गुर्जर यांनी ही मदत या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली.