मुंबई : एका ३६ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून आढळून आलेली मोठी गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने केलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल २.७५ किलो वजनाची गाठ महिला रुग्णाच्या पोटातून काढली. रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.काही दिवसांपूर्वी ही महिला पोटदुखी व रक्तस्रावासंबंधी तक्रार घेऊन येथे उपचारासाठी आली होती. याआधी दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे पोट साधारणपणे ७ महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत होते. तिची अधिक तपासणी व आवश्यक अत्याधुनिक चाचण्या केल्या असता, तिच्या गर्भाशयात मोठी गाठ आढळून आली. ही गाठ वाढती असल्याने, तसेच या गाठीचा रुग्णाच्या जीविताला असणारा धोका लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले, अशी माहिती कूपर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. गणेश शिंदे यांनी दिली.त्या महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण केवळ ४ होते. तसेच सातत्याने रक्तस्राव देखील चालू होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे धोक्याचे होऊ शकले असते. ही बाब लक्षात घेऊन शस्त्रक्रियेपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी व रक्तस्राव थांबविण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर हिमोग्लोबिन योग्य प्रमाण वाढल्यावर आणि रक्तस्राव थांबल्यानंतर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही गाठ अतिशय मोठी असल्याने डॉ. शिंदे यांनी स्वत:च शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. गणेश शिंदे, साहाय्यक प्राध्यापिका डॉ. हेमलता कुहिते, डॉ. हेमा रेलवानी, डॉ. नेही पारिख या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सलग दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण महिलेच्या पोटातून मोठी गाठ काढली.>गर्भाशयातील गाठीची महत्त्वाची लक्षणेया शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गर्भाशयातील गाठीच्या लक्षणांबाबत माहिती देतानाडॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले, गर्भाशयात गाठ असणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे, लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होणे, अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारची लक्षणे आढळून आल्यास महिलांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा व दुखणे अंगावर काढू नये, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
गर्भाशयातून काढली पावणेतीन किलोची गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:26 AM