ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - देशाची पहिली महिला शिक्षिका, समाजसेविका, कवी आणि वंचितांविरोधात आवाज उठवणा-या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची आज 186 वी जयंती आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबाबत 10 खास गोष्टी जाणून घेऊया.
1. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, 1831 साली झाला होता.
2. 1840 साली केवळ 9 वर्षांची असताना सावित्रीबाई फुले यांचे लग्न 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्यासोबत लावण्यात आले.
3. सावित्रीबाई फुले यांनी आपले पती आणि क्रांतिकारी नेता ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून, समाजाविरोधात लढा देऊन मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यांनी पहिली आणि अठरावी शाळा पुण्यातच सुरू केली.
4. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच नारी मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या महिला नेत्या होत्या.
5. 28 जानेवारी 1853 रोजी गर्भवती बलात्कार पीडितांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
6. सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाहसारख्या बुरसटलेल्या प्रथांविरोधात ज्योतिराव फुलेंसोबत मिळून समाजप्रबोधनाचे कार्य केले.
7. सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या विधवा ब्राम्हण महिलेचे स्वतःच्या घरात बाळंतपण केले. या महिलेचे नाव होते काशीबाई. यानंतर सावित्रीबाईंनी तिचा मुलगा यशवंतला दत्तक घेतले. सावित्रीबाईंनी यशवंताचे पालनपोषण करुन त्याला डॉक्टर बनवले.
8. महात्मा ज्योतिराव फुले यांचे 1890 साली निधन झाले. यावेळी सावित्रीबाईंनी त्यांचे अपूर्ण राहिलेली अनेक कार्ये पूर्ण करण्याचा संकल्प केला.
9. सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 साली निधन झाले. प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करत असताना त्यांनीही प्लेगची लागण झाली होती.
10. सावित्रीबाई यांनी संपूर्ण जीवन समाजातील वंचितांसाठी विशेष करुन महिला आणि दलितांना अधिकारी मिळवून देण्यासाठीच्या संघर्ष केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता प्रसिद्ध असून ज्यात सर्वांना शिकण्यासाठी प्रोत्साहन करण्यात आले आहे.