Join us

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 8:23 PM

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील एका भूखंड व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे सुरू असलेला केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)  यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी दोन डझनहून अधिक कंपन्यांचे संचालक असल्याचे समोर येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

नंदकिशोर चतुर्वेदी संचालक असलेल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या एकाच पत्त्यावर चतुर्वेदीच्या १९ कंपन्या रजिस्टर्ड आहेत, अशी माहिती मिळत आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी  पेशाने सीए आहे. मात्र कोणतीही सीए फर्म चालवत नाहीत. नंदकिशोर चतुर्वेदी  शेल कंपनी ऑपरेट आहेत, असे सांगितले जात आहे. 

विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना

सूत्रांच्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक शेल कंपन्यांची नोंदणी आहे. मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना केली आहे. या शेल कंपन्यांच्या माध्यमातून १५ ते २० वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील एका भूखंडाच्या व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. साधारणपणे, मार्च २०२१ पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी यांची चौकशी सुरु आहे. यानंतर चतुर्वेदी मे २०२१ पासून  आफ्रिकेच्या एका देशात वास्तव्यास असून, नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर हे दोघे एकमेकांना २००९ सालापासून ओळखतात, अशी माहिती ईडी सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, नंदकिशोर चतुर्वेदी यांनी हमसफर डीलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटींचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेलने लाटला व तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पात गुंतवला, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेअंमलबजावणी संचालनालयइन्कम टॅक्स