Sanjay Raut: तुरुंगात मलिक आणि देशमुखांची भेट होते का? संजय राऊत दिवसभर काय करतात? समोर आला दिनक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:58 PM2022-08-13T13:58:06+5:302022-08-13T13:59:32+5:30
Sanjay Raut: संजय राऊत दिवसभर नक्की काय करतात, आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम नेमका कसा आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती.
मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. सुरुवातीला ईडी कोठडी सुनावल्यानंतर पीएमएलए विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर संजय राऊत यांची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. मात्र, संजय राऊत दिवसभर कारागृहात काय करतात, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. तेव्हापासून संजय राऊत यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ईडी कारवाईपूर्वी संजय राऊत हे दररोज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत यांना कायम प्रसारमाध्यमांचा गराडा पडलेला असायचा. मात्र, ईडीने केलेल्या अटकेनंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांपासून इतके दिवस लांब राहिल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम नेमका कसा आहे, ते तिकडे नक्की काय करत आहेत, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती.
संजय राऊतांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेय
संजय राऊत यांचा कैदी क्रमांक ८९५९ आहे. संजय राऊतांना घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येत असली तरी, संजय राऊत आपला बराचसा वेळ वाचन, लिखाणामध्ये घालवतात. शिवाय बातम्याही ते पाहत असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संजय राऊत यांना तुरुंगात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. राऊत सध्या स्वतंत्र बराकीत आहेत. राऊत या कारागृहात वेळ मिळाल्यावर ग्रंथालयात वाचन करतात, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवरील बातम्यांवर त्यांचे लक्ष असते. कारागृहात त्यांना लेखनासाठी वही, पेन व अन्य साहित्य पुरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विशेष कैदी असल्यामुळे राऊतांनाही सामान्य बराकीऐवजी १० बाय १० आकाराच्या स्वतंत्र खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. या खोलीमध्ये पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या बरकीत संजय राऊत यांच्याशिवाय इतर कोणता कैदी नाही. आर्थर रोड कारागृहात मोजक्याच लोकांना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भेटायला त्यांचे बंधू सुनील राऊत आर्थर रोड कारागृहात गेले होते. विशेष म्हणजे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मुक्कामही सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.