Join us

Rajya Sabha Election 2022: राऊत ज्या संजय पवारांना गरीब म्हणाले, ते आहेत कोट्यवधींचे मालक! जाणून घ्या संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 2:16 PM

Rajya Sabha Election 2022: संजय पवार यांना गरीब म्हणणाऱ्या राऊतांच्या संपत्तीत १० पट तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत १४ पट वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: तब्बल २४ वर्षानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर चांगलीच आखपाखड करत निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप पुन्हा एकदा केला.

महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत, असे सांगत ते गरीब असल्याचा उल्लेख संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला. मात्र, संजय पवार कोट्यवधींचे मालक असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर येत आहे. 

संजय पवार आहेत कोट्यवधींचे धनी

कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या संजय पवार यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे सांगितेल जात आहे. संजय पवार यांच्याकडे ७५ हजार रुपये, तर पत्नी ज्योत्स्ना पवार यांच्याकडे २१ हजारांची रोख रक्कम आहे. तर संजय पवार यांची संजय पवार यांच्या नावावर ५६,१९,१३२ रुपयांची चल तर २,७३,५६,१७१ रुपयांची अचल अशी ३,२९,७५,३०३ रुपयांची संपत्ती आहे. तर, पत्नीच्या नावावर ४७,२९,७७६ रुपयांची चल संपत्ती आहे. संजय पवार यांच्याकडे २०२१ मध्ये विकत घेतलेली २८.७६ लाखाची इनोव्हा कार आहे. संजय पवार यांच्या उत्पन्नाचे साधन शेती, व्यवसाय आणि व्याज तर त्यांच्या पत्नीला वेतनही मिळते. तसेच संजय पवार यांच्यावर ४७ लाख रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. 

संजय राऊतांच्या संपत्तीत १० पट वाढ

संजय राऊत यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, २०१० मध्ये चल व अचल संपत्ती मिळून संजय राऊत यांच्या नावावर ९६.९९ लाख रुपयांची मालमत्ता होती. सन २०२२ मध्ये ती १०.४७ कोटी झाली. तर पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर २०१० मध्ये ५८.२२ लाखांची मालमत्ता होती. सन २०२२ मध्ये ती ८.२४ कोटी झाली. म्हणजेच राऊत यांच्या मालमत्तेत १२ वर्षांत १० पट तर वर्षा यांच्या मालमत्तेत १४ पट वाढ नोंदवली गेली. चलच्या तुलनेत अचल संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. राऊत यांच्या चल संपत्तीत १३ तर, अचल संपत्तीत १० पट वाढ झाली. वर्षा यांची चल ४ पटीने तर अचल संपत्ती १९ पटीने वाढल्याचे शपथपत्रावरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे ईडीकडून जप्त झालेली मालमत्ताही संजय राऊत यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नोंदवल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :संजय राऊतसंजय पवारशिवसेना