मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:28 PM2024-08-28T16:28:17+5:302024-08-28T16:31:36+5:30
Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue: या घटनेनंतर पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue: मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हा पुतळा कोसळल्यानंतर याचा शिल्पकार असलेल्या जयदीप आपटे तसेच बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी दिली. जयदीप आपटे फरार असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेबाबत नौदलाकडून एक स्वतंत्र अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण?
२५ वर्षीय जयदीप आपटे मेसर्स आर्टिस्ट्री नामक कंपनीचा मालक आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या जयदीप आपटे याच्या शाळेजवळ सदाशिव साठे यांचा शिल्प घडवण्याचा स्टुडिओ होता. इयत्ता आठवीला असतानाच या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय जयदीप आपटे याने घेतला होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून मूर्तिकला विषयात डिप्लोमा पूर्ण केला. मालवण येथे २८ फुटी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापूर्वी एवढा मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव जयदीप आपटे याला नव्हता. यापूर्वी जयदीप आपटे याने केवळ दीड ते अडीच फुटी मूर्ती किंवा पुतळे तयार केले होते. मात्र, मालवण येथे शिवरायांचा एवढा मोठा पुतळा उभारण्याचे काम नौदलाने जयदीप आपटेला दिले.
जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर जयदीप आपटे याने एका दैनिकांशी संवाद साधला होता. २८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनविण्यास ३ वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून २०२३ मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला. या पुतळ्याच्या कामासंबंधी प्रथम समजले, तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला की, संधी मोठी आहे, सगळे व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळेच संपेल, असे वाटले. पण म्हटले की, काय व्हायचे ते होऊ दे. संधी हातातून सोडायची नाही.
नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार शिल्प बनवले
कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी ३ ते ४ शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली की, एखादा पुतळा तयार करणार का? भारतीय नौदल काम करून घेणार आहे. त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार होता; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले.
प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या रहात होत्या
३ डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचे, किंबहुना तरच हे काम अल्प वेळात पूर्ण होईल. तसे चालू केले; पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, असे लक्षात आले. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल ३ डायमेन्शनल प्रिंट करायचे, असे ठरवले. ३ डायमेन्शनल प्रिंटिंग व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत. त्यांनी एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले. महत्त्वाचा टप्पा होता तो कास्टिंग झालेले तुकडे एकत्र जोडणे. पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो; पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प ही दोन्ही गणिते बघता पुतळा जागेवर जोडायचा ठरवले. अगदी जागेवर विषारी साप निघण्यापासून, कधी पाऊस, कधी आपसांत वाद, कधी विजेचा खेळखंडोबा, एक ना दोन. प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या रहात होत्या.
शिवाजी महाराजांच्या विचाराने ऊर्जा मिळाली अन् काम पूर्ण केले
छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर किती अवघड प्रसंगांना धीराने तोंड दिले आहे, तर मग आपण त्या तुलनेत काहीच सहन करत नाही. या विचाराने ऊर्जा मिळायची आणि केवळ त्यामुळे काम पूर्ण करू शकलो. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी महाराज आग्र्याला अडकले होते, तेव्हा किल्ल्याचे बांधकाम करणाऱ्यांनी स्वतःचे घर, दागिने गहाण ठेवून काम पूर्ण केले होते. त्याचप्रमाणे प्रारंभी माझे कुटुंबीय, माझे मित्र यांनी पुष्कळ साहाय्य केले. काम शेवटच्या टप्प्यात असतांना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्कळ साहाय्य केले, असे जयदीप आपटे याने सांगितले होते.