मुंबई : नागरिकायन संशोधन केंद्राने माझा नगरसेवक, माय कॉर्पोरेटर नावाचे ॲप रिडिझाईन केले असून, यामध्ये मुंबईकरांना घरबसल्या आपल्या नगरसेवकाची कुंडली पाहता येणार आहे. आपल्या नगरसेवकाने पालिकेतल्या किती सभांना किती वेळ हजेरी लावली, यासह किती कामांसाठी किती निधी खर्च केला, यापासून आपल्या नगरसेवकाने केलेल्या कामांची माहितीदेखील नागरिकांना माहिती अधिकाराखाली मिळवता येणार आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागातील ४४ नगरसेवकांची एकूण ५६ प्रगतिपुस्तके या ॲपवर आहेत. त्यात आता तीन नव्या गोष्टी नवीन फिचर्ससह अपलोड करण्यात आल्या आहेत. यात नगरसेवकांच्या उपस्थितीचा समावेश आहे. यात नगरसेवक, नामनिर्देशित नगरसेवक, बिगर नगरसेवक आणि बिगर पालिका सदस्य अशा सर्व प्रकारातील जवळपास २८५ लोकांच्या २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीतील प्रत्येक वर्षानुसार उपस्थितीचा समावेश आहे.
प्रगतिपुस्तक बनवा : ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपापल्या नगरसेवकांची प्रगतिपुस्तके बनवली आहेत. अजूनही नागरिकांना आपल्या नगरसेवकाची प्रगतिपुस्तके बनवायची असल्यास प्रगतिपुस्तके बनवा, या पानाचा वापर करता येईल. या पानावर गेल्यानंतर तुमची माहिती भरल्यानंतर तिथे माहिती अधिकाराचे नमुना अर्ज दिसतील. नगरसेवकाच्या प्रगतिपुस्तकासाठी कोणती माहिती घ्यायची आहे, त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद आहे. नागरिकाला तो अर्ज फक्त डाऊनलोड करून प्रिंट काढायची आहे आणि वैयक्तिक तपशील भरून अर्ज दाखल करायचा आहे. मुंबईतील नगरसेवकांसाठी आणि मुंबईबाहेरील महापालिकेतील नगरसेवकांसाठी असे दोन प्रकारचे अर्ज तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे आता कोणत्याही नागरिकाला आपल्या नगरसेवकाचे प्रगतिपुस्तक बनवायचे झाल्यास या ॲपच्या माध्यमातून ते सहजपणे करता येईल.
सर्वेक्षण या पानावर गेल्यास कोरोना काळात नागरिकांप्रती नगरसेवकाचे वर्तन कसे होते, याचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोना काळात नगरसेवकांना मिळालेला निधी, त्याचा वापर, नगरसेवकांनी पुरवलेल्या सोयीसुविधा, त्यांचा सहभाग अशा प्रकारचे दहा प्रश्न त्यात विचारलेले आहेत आणि बहुपर्यायी उत्तरांमधून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचा निकाल महापालिका निवडणुकांच्या आधी जाहीर होणार आहे.आनंद भंडारे, समन्वयक, नागरिकायन संशोधन केंद्र
एक व्हिडीओ नगरसेवकांच्या कामांचा तपशील हवा असेल तर खरेदी आदेश याची माहिती मिळवावी लागते. ते सगळे खरेदी आदेश महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र, ते संकेतस्थळावरून कसे घ्यायचे, याचा कुठलाही तपशील महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा एक छोटासा व्हिडिओ देखील येथे पाहता येईल.
तीन तरुण कोण ? प्रतीक काते, योगेश दर्गे आणि नवनाथ गावडे या तरुणांनी हे ॲप तयार केले आहे. योगेश हा भाईंदरला, नवनाथ ठाण्यात, तर प्रतीक लंडनमध्ये राहतो.