Join us

...म्हणून केरे पाटलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 6:12 AM

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली पैसे उकळल्याबाबत सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या आरोपांमुळे मराठा क्रांती  मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी  ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

औरंगाबाद येथील  रहिवासी असलेले केरे पाटील १६ ऑक्टोबरला मुंबईत आले असता त्यांनी हॉटेलमध्येच उंदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी केरे पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार विवेकानंद बाबर, अनिरुद्ध शेलार, योगेश केदार, संदीप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदीप कणसे यांसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केरे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची चळवळ उभारली. २०१९ मध्ये सहकारी आबासाहेब पाटील आणि बाबर यांनी फोनद्वारे झालेल्या संभाषणात मोर्चादरम्यान झालेल्या आर्थिक देवाण-घेवाण तसेच झालेल्या खर्चाबाबत संभाषण केले. हे संभाषण बाबरने रेकॉर्ड करून ठेवले. त्यात बदल करून काही आमदार व मंत्र्यांची नावे टाकून मराठा मोर्चाच्या ग्रुपवर ११ ऑक्टोबर रोजी व्हायरल केली. यावेळी वरील सहकाऱ्यांनीही बदनामी केल्याचे केरे पाटील यांनी नमूद केले आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून भेटमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जे. जे. रुग्णालयात जाऊन मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांकडून मुख्यमंत्र्यांनी केरे पाटील यांच्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली. जे जे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेले रमेश केरे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर औषधवैद्यक शास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. प्रिया पाटील यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. केरे पाटील यांना लवकरच अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलविले जाणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चाएकनाथ शिंदे