जाणून घ्या, मॅगेसेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. वाटवाणीचं समाजकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 10:02 AM2018-07-27T10:02:54+5:302018-07-28T11:36:13+5:30
आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा 'रॅमन मॅगेसेसे पुरस्कार' यंदा सहा जणांना जाहीर झाला. त्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. भारत वाटवाणी यांची निवड करण्यात आली आहे. वाटवाणी यांनी...
मुंबई - आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा 'रॅमन मॅगेसेसे पुरस्कार' यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. भारत वाटवाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर लडाखमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेले सोनम वांगचुक यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले डॉ. भारत वाटवाणी यांचे वैद्यकीय क्षेत्रातीलस कार्य अनन्यसाधारण आहे. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असलेल्या वाटवाणी यांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मानसिक रुग्णांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन केले आहे. या रुग्णांवर केवळ उपचार करुनच ते थांबले नाहीत, तर वाटवाणी यांनी या रुग्णांची त्यांच्या कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली. वाटवाणी यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा आशियातील नोबेल म्हणजेच रॅमन मॅगेसेसे देण्यात येणार आहे. श्रद्धा फाऊंडेशन रिहॅबिलिटेशन संस्थेतील सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने आणि कामानेच हा पुरस्कार मिळाला आहे. तर या पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करण्याची आणखी ऊर्जा मिळाल्याचे डॉ. वाटवाणी यांनी म्हटले आहे.
श्रद्धा रिहॅबिलिटेशन
मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेल्या डॉ. वाटवाणी आणि त्यांच्या पत्नी यांनी सामाजिक जाणिवेतून मनोरुग्णांवर मोफत उपचार करण्याचे समाजकार्य सुरु केले. त्यासाठी 1988 मध्ये अशा रुग्णांसाठी त्यांनी श्रद्धा रिहॅबिलिटेशन नावाने फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातूनच त्यांनी मनोरुग्णांसाठी मोठे सामाजिक कार्य उभारले. तब्बल 30 वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानंतरच, त्यांना हा मानाचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार देण्यात आला आहे.
अशी झाली कामाला सुरुवात
एकदा लांब केस वाढलेला एक तरुण दारुच्या नशेत रस्ताच्या बाजूकडील गटाराचे पाणी पिताना वाटवाणी यांना दिसला. त्याचवेळी, त्यांच्या संवेदनशील मनाने मानवतेची जागा घेतली. त्यावेळी, त्यांनी त्या तरुण मनोरुग्णावर उपचाराला सुरुवात केली आणि तेथूनच अशा मनोरुग्णांसाठी काम करण्याचा चंग त्यांनी बांधला. विशेष म्हणजे वाटवाणी यांनी या तरुण रुग्णाबद्दलचे सत्य माहित करुन घेतले, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण, उपचार केलेला हा तरुण बीएससी पदवीधर असून त्याने मेडिकल लॅबोरेटरीचा डिप्लोमाही पूर्ण केला होता. तर या तरुणाचे वडिल आंध्र प्रदेशमध्ये पोलीस अधिकारी होते. त्यास सिझोफ्रेनिया (schizophrenia) नावाचा आजार जडला होता. डॉ. वाटवाणी यांनी या तरुणावर उपचार करुन त्यास त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. तेथूनच वाटवाणी यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून अभिनंदन
Two Indians, Dr Bharat Vatwani, who has devoted his life to serving the mentally ill on the streets and Sonam Wangchuk, a Ladakhi inventor, are recipients of the prestigious #Magasaysay Award, 2018. I congratulate them both and salute their achievements. https://t.co/wFNKoNghRn
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2018