Sharad Pawar : राजीनाम्याचा निर्णय मागे घेताना काय म्हणाले शरद पवार; वाचा, त्यांचं निवेदन जसंच्या तसं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:06 PM2023-05-05T18:06:34+5:302023-05-05T18:07:15+5:30

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतला.

know What ncp chief Sharad Pawar said while withdrawing his decision to resign Read his statement politics ajit pawar | Sharad Pawar : राजीनाम्याचा निर्णय मागे घेताना काय म्हणाले शरद पवार; वाचा, त्यांचं निवेदन जसंच्या तसं

Sharad Pawar : राजीनाम्याचा निर्णय मागे घेताना काय म्हणाले शरद पवार; वाचा, त्यांचं निवेदन जसंच्या तसं

googlenewsNext

नुकतंच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांच्या निर्णयाचा पक्षातून विरोधही करण्यात आला. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीनंही शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं असं म्हटलं होतं. यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण आपला निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. 

वाचा शरद पवार यांचं निवेदन जसंच्या तसं

दिनांक २ मे, २०२३ रोजी 'लोक माझे सांगाती' ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यानी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने 'मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

मी पुनश्चः अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्चः जाहिर करतो. धन्यवाद !

Web Title: know What ncp chief Sharad Pawar said while withdrawing his decision to resign Read his statement politics ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.