मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आपापल्या नोंदणीकृत पक्षांचे अध्यक्ष असताना सभागृहात मात्र ते भाजपाचे सदस्य आहेत. त्यामुळे हे तीन नेते नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केला.महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपाकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून शिवसेनेचे अनिल परब यांनी काल काही प्रश्न उपस्थित केले होते. बुधवारी जयंत पाटील यांनी हाच मुद्दा उपस्थित केला.मंत्रिमंडळातील सदस्य जानकर, मेटे आणि सदाभाऊ खोत हे सदस्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या आपापल्या पक्षाचे अध्यक्ष असताना भाजपाच्या चिन्हावर विधान परिषदेचे सदस्य कसे होऊ शकतात, असा सवाल करत यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे, अनिल परब यांनीही पाटील यांच्या मुद्द्याचे समर्थन केले.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिल्यानंतरही सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर सभापतींनी याबद्दल निवडणूक अधिकारी तसेच राज्याचे महाअभिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन सभागृहाला माहिती दिली जाईल, असे सांगत विषय संपवला.>शिक्षकांना अर्जित रजा विकू द्याकनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना त्यांची अर्जित रजा विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. शिक्षकांना पूर्वीपासूनच अर्जित रजा विकण्यास परवानगी नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तशी परवानगी होती. मात्र, सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तीही काढून घेण्यात आली, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.
जानकर, मेटे, सदाभाऊ नेमके कोणत्या पक्षाचे?, विरोधकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:49 AM