ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक - व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 03:03 AM2019-03-27T03:03:55+5:302019-03-27T03:04:35+5:30

येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

 Knowledge is the driver of Indian economy - venkaiah naidu | ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक - व्यंकय्या नायडू

ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे चालक - व्यंकय्या नायडू

Next

मुंबई : येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नसून शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होत आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी सांगितले.
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च संस्थेच्या १६ व्या पदवीदान समारंभात उपराष्ट्रपती बोलत होते. या वेळी संस्थेचे संचालक एस. महेंद्र देव, जयती सरकार, सी. वेकंट, जयमोहन पंडित आदी उपस्थित होते. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च ही संस्था राष्ट्रीय, जागतिक विकासाच्या समस्येवर भाष्य करणारे एक प्रभावशाली केंद्र आहे, असे अधोरेखित करीत उपराष्ट्रपती नायडू यांनी संस्थेचे कौतुक केले.

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज
शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान मिळते आणि जगामध्ये वावरायचे कसे याची माहिती होते. कोणत्याही प्रकारचे भेदभाव टाळण्यासाठी सर्व स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील राष्ट्रप्रेमाचे मूल्य वाढविण्याच्या उद्देशाने त्यांना वस्तुस्थिती, इतिहास, प्राचीन संस्कृतीची समृद्धी आणि वारसा यासारख्या गोष्टींची शिकवण देणे आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

‘स्वत:मधील रचनात्मक वृत्ती विकसित करा’
सार्वजनिक सेवा, महिलांचे आरोग्य, प्रदूषण, आरोग्य आणि शिक्षणातील समस्या, श्रम आणि आर्थिक बाजार इत्यादी अनेक समस्या भारतासमोर आहेत. अशावेळी संशोधन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या अडथळ्यांवर मात कशी करायची यावर मार्ग शोधून काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, संशोधनाचा, शिक्षणाचा उपयोग आपली अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी होणे आवश्यक आहे. भारताला विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन, नवीन कल्पना, प्रामाणिक क्रियाशीलता आणि निरंतर देखरेख याचाच उपयोग अधिक होणार असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

Web Title:  Knowledge is the driver of Indian economy - venkaiah naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.