अधिकारी इटलीतून घेणार ‘फायद्याचे ज्ञान’?
By admin | Published: April 14, 2015 12:30 AM2015-04-14T00:30:34+5:302015-04-14T00:30:34+5:30
आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आखून संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आखून संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाचे अधिकारी परदेश दौऱ्यावर जाऊनही एसटीत फारसे काही बदल होताना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एएसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) इंटलीचा परदेश दौरा आखण्यात येत असून, यासाठी एसटी महामंडळाकडूनही पाच जणांना दौऱ्यावर पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एएसआरटीयू ही देशातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळांची एक शिखर संस्था आहे. सर्व मार्ग परिवहन महामंडळांना एका मंचावर आणून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी १९६५मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. देशातील शहरी तसेच ग्रामीण भागात वाहतूक सेवा देणारी ६२ परिवहन महामंडळे या संस्थेची सदस्य आहेत. या संस्थेकडून प्रत्येक वर्षी किंवा एका वर्षाआड परिवहन महामंडळांसाठी परेदशात अभ्यास दौरा आखला जातो. यासाठी प्रत्येक महामंडळाकडून पाच जणांना दौऱ्यावर पाठविण्यात येत. एसटी महामंडळाकडूनही या दौऱ्यासाठी पाच जणांना पाठवण्यात येते.
मात्र लंडन, चीन, मॅक्सिको, सॅन फ्रॅन्सिस्को यासह बऱ्याच देशांत एसटीचे अधिकरी जाऊनही काही फलित साध्य झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटीचा २0१२-१३ मध्ये ४२८ कोटी, २0१३-१४ मध्ये ५00 कोटी आणि २0१४-१५ मध्ये जवळपास ६00 कोटींपेक्षा जास्त तोटा झाल्याचे सांगण्यात आले. असे असून परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून हा तोटा कमी करण्यात यश आलले नाही. यंदाही जून महिन्यात एएसआरटीयूतर्फे इटलीमध्ये अभ्यास दौरा आखण्यात येत असून, यासाठी एसटीकडून पाच जणांना पाठवण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. (प्रतिनिधी)
मागील वर्षी अभ्यासासाठी मॅक्सिको आणि सॅन फ्रॅन्सिस्कोसाठी अभ्यास दौरा झाला होता. त्यात तांत्रिक ज्ञान आणि माहिती नसलेल्यांची वर्णी लागली होती. यंदाही इटली दौऱ्याची चर्चा असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावलेली असल्याचे सांगण्यात आले.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष एएसआरटीयूच्या स्थायी समितीच्या (पुरवठा व करार) अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे इटलीमध्ये दौरा झालाच तर तो त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आहे.
इटलीला होणाऱ्या दौऱ्याबाबत सध्या मला काहीही बोलायचे नाही. अजून त्याबाबत काही नक्की नाही.
- संजय खंदारे (एसटी महामंडळ- उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)