अजित पाटील, चिरनेर - पावसाळ्यात मासळीचा प्रजनन काळ असतो या कारणासाठी म्हणून पावसाळी मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने १९९६ पासून घेतला त्यानंतर मागच्या १८ वर्षात नेहमीच आलटून पालटून मत्स्य दुष्काळाचा सामना मासेमारांना करावा लागला आहे. याचा अर्थच जे कारण देऊन पावसाळी मासेमारी बंद ठेवली जातेय ते कारणच कारणी लागत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. किनार्यांवर होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण, डिझेल परताव्यासाठी पहावी लागणारी सततची वाट, तिवरांची बेसूमार कत्तल आणि मासळीच्या हंगामाच्या काळात असणारी शासकीय बंदी या कारणांमुळे मासेमार मात्र भीकेला लागण्याच्या धोका करंजा मच्छिमार सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रदिप नाखवा आणि माजी उपाध्यक्ष अमरनाथ नाखवा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे. मुंबईच्या समुद्र किनार्यावर बॉम्बे डक नावाने प्रसिध्द असणारे बोंबील आणि निर्यातीसह स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणारी कोलंबी मासळी मिळण्याचा काळ हा जुलै - आॅगस्ट असा असतो मात्र महाराष्टÑात नेमकी याच दिवसात मासेमारी बंद राहत असल्याने ही सर्व मासळी प्रवाहाच्या दिशेने गुजरात आणि पाकिस्तानच्या किनार्यांकडे जात असते त्यामुळे महाराष्टÑातील मासेमार मात्र हे सर्व बघत मासेमारी बंदी केव्हा उठते याची वाट पाहत ज्या हंगामात मासळी मिळत नाही अशा हंगामात मासळीसाठी पाण्यात उतरतो त्यातून मिळणार्या मासळीच्या विक्रीतून मासेमारीसाठी झालेला खर्च, मासेमारी नौकांच्या कर्जाचे हप्ते, मासेमारी नौकांवरील कर्मचार्यांची देणी आदी भागवतांना मासेमारांना नाकीनऊ येत असल्याचे नाखवा यांनी बोलतांना सांगितले. १९८९ साली समुद्रात आलेल्या तुफानीमध्ये शेकडो मासेमार बांधवांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पावसाळ्यातील समुद्राचे खवळणे आणि पावसाळ्यातच मासळीचा प्रजनन काळ असतो या कारणासाठी पावसाळी मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार केंद्र सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्रात १५ जून ते १५ आॅगस्ट हा मासेमारी बंदीचा काळ आहे.या काळात महाराष्ट्राच्या किना-यावर सर्रासपणे अतिक्रमणे होत आहे.
मच्छीमार समस्यांच्या विळख्यात
By admin | Published: May 25, 2014 3:38 AM