मुंबई मेथ, गांजाच्या विळख्यात

By admin | Published: July 29, 2014 12:50 AM2014-07-29T00:50:23+5:302014-07-29T00:50:23+5:30

व्यसनाधिनता रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एकीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. तर दुसरीकडे अंमलीपदार्थांच्या तस्करांवर धडक कारवाई आरंभली आहे

Known as Mumbai Meth, Ganja | मुंबई मेथ, गांजाच्या विळख्यात

मुंबई मेथ, गांजाच्या विळख्यात

Next

मुंबई : व्यसनाधिनता रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एकीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. तर दुसरीकडे अंमलीपदार्थांच्या तस्करांवर धडक कारवाई आरंभली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी दाखल झालेले गुन्हे, हस्तगत अंमलीपदार्थ आणि अटक आरोपींमध्ये कैक पटीने वाढ झाली आहे. असे असूनही पोलिसांच्या हातावर तुरी देत अंमली पदार्थ बेधडकपणे मुंबईत धडकत आहेत. अत्यंत सहजतेने ते नशेबाजांच्या हाती पडत आहेत. व्यसनाधिनता रोखण्यासाठी कंबर कसणाऱ्या मुंबई पोलिसांसमोरील हीच डोकेदुखी ठरते आहे.
सध्या मुंबईला मेथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि कोकेनला पर्याय ठरणाऱ्या अंमली पदार्थाची नशा चढली आहे. तसेच चरसचे भाव अचानक तिप्पट झाल्याने चरसींच्या चिल्लीममध्ये चरसच्या गोळीऐवजी गांजा दिसू लागला आहे. सर्वात धोकादायक म्हणजे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कफसिरप, झोपेच्या गोळया आदी औषधांच्या नशेला बळी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
मुंबई, ठाणे, नवीमुंबईतल्या पार्टी अ‍ॅनीमल्सपासून रस्त्यावरील गर्दुल्ल्यांपर्यंत साऱ्यांनाच मेथची चटक लागली आहे. धक्कादायक म्हणजे मेथच्या पुडया विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांनाही हा पदार्थ काय, कशापासून बनतो, त्याचे धोके काय याबददल पुसटशी कल्पनाही मेथची नशा करणाऱ्यांना नाही. गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मेथ या नावाने विकला जाणारा अंमलीपदार्थ मेटाअ‍ॅम्फेटामाईन आहे. आईस हा पार्टीड्रग बनविण्यासाठी मेटाअ‍ॅम्फेटामाईनचा वापर होतो. तसेच विविध प्रकारच्या औषध निर्मितीतही या रसायनाचा वापर केला जातो.
मेथ काच, तुरटी किंवा सारखेरच्या कणांसारखा असतो. काचेवर किंवा स्टीलच्या ताटात हे कण रगडून त्याची पूड केली जाते. ती कोकेनप्रमाणे नाकातून आत खेचली जाते किंवा पाण्यात विरघळवून प्यायली जाते. याची नशा चार ते पाच तास टिकते. साधारणपणे शांत दिसणारे ही नशा केल्यानंतर उत्तेजित होतात. त्यांच्यात उत्साह संचारतो.
कोकेनही चाटले, चघळले किंवा नाकाने ओढले जाते. मात्र एक ग्रॅम कोकेनची नशा सर्वसाधारणपणे चार ते पाच वेळा करता येते. मेथ मात्र दोन ते तीन दिवस चालते. मेथचे कण बारिक करण्यासाठी डेबीट-क्रेडीट कार्डाचा वापर होतो. जितके रगडू तितकी जास्त भुकटी या कणांपासून बनते. ती बराचवेळ चालते. शिवाय याची किंमतही कोकेनपेक्षा कमी आहे आणि कीक जास्त. त्यामुळे सध्या मेथचीच चलती आहे. मुंबई पोलिसांनी व्यसनाधिनता रोखण्यासाठी दोन पातळयांवर कारवाई सुरू केली आहे. अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याबददलची जनजागृती शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर दुसऱ्याबाजुला अंमलीपदार्थांचे तस्कर, छोटया प्रमाणात त्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईही आरंभली आहे. त्यामुळेच गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी पहिल्या सहा महिन्यात दाखल झालेले गुन्हे, हस्तगत पदार्थ आणि अटकेची कारवाई यात अनेक पटींनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये ६०४ गुन्हयांमध्ये २००९ आरोपी गजाआड झाले होते. त्यांच्याकडून ७६ किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत एक कोटी ६७ हजार इतकी होती. तर या वर्षी पहिल्या सहा महिन्यात ४८६७ गुन्हे दाखल झाले. त्यात ६९७८ आरोपींना अटक झाली. त्यांच्याकडून ३७९ किलो विविध प्रकारचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Known as Mumbai Meth, Ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.