लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कुठला डाव कधी टाकायचा, कधी कोणाला पायचीत करायचे हे आपल्याला ठाऊक आहे. दीड वर्षांपूर्वी आपण असाच एक कार्यक्रम केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. राज्यातील नकारात्मक शक्ती दूर सारून राज्य सकारात्मक दृष्टीने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते झाले. तालुका क्रीडा संकुलाचे काम मागील काही वर्षे रखडले होते. मात्र, आज हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात आता नवीन फिटनेस पिढी तयार होत आहे. राज्य शासन खेळाडूंसाठी नवनवीन सुविधा देत आहे, त्यांच्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच खेळातील बक्षिसांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. आपण पालकमंत्री असल्यापासून खेळासाठी काम करत आहोत, येत्या काळात जिल्ह्यातून नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दादोजी कोंडदेव स्टेडियमची पांढरा हत्ती ही ओळख आता पुसली गेली आहे, याठिकाणी आता रणजीचे सामने होत आहेत. ठाणे जिल्ह्याला खेळाचा जुना इतिहास आहे. आम्ही पूर्वी एकत्र व्यायामाला जात होतो, मात्र आता काळ बदलला आहे. पूर्वी खेळात निवडक संधी होत्या, आता अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, ही चांगली बाब असल्याचेही शिंदे म्हणाले.
सेंट्रल पार्कचे ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ नामकरण
तब्बल २० एकरामध्ये बांधण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचे ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ असे नामकरण करण्यात यावे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या मतदारसंघात हे भव्य सेंट्रल पार्क बांधण्यात आले असून, या पार्कचे ‘नमो सेंट्रल पार्क’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार केळकर यांनी या कार्यक्रमात केली. लागलीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या नावाची घोषणा केली. शहरात आज ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची गरज असून, हे पार्क ऑक्सिजन देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल न बिघडवता सरकारच्या वतीने सर्व प्रकल्प राबवले जात आहेत. २२ किमीचा शिवडी नाव्हाशेवा प्रकल्प हे त्याचे उदाहरण असून, या प्रकल्पात फ्लेमिंगो पळून जातील, असे काही जण म्हणाले होते. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, यामुळे फ्लेमिंगो दुप्पट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यात एवढे मोठे सेंट्रल पार्क उभे राहिल्याने ठाण्यातील लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
स्नो पार्कची पुन्हा घोषणाठाण्यात स्नो पार्कची काही वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प अद्याप कागदावर आहे. भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ठाण्यात स्नो पार्क उभारण्यात यावे, अशी सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली.