मुंबई : भारताने ज्या पद्धतीने कोरोनाची हाताळणी केली, त्याचे साऱ्या जगाला कौतुक आहे. कारण जवळपास १४० कोटी लोकसंख्येच्या या देशात कोरोना प्रसाराचा धोका सर्वाधिक होता. पण जितक्या वेगाने संसर्गप्रसार झाला तितक्याच वेगाने तो आटोक्यात आणण्यात भारताला यश आले. त्यामुळेच तुम्ही आज रेड लिस्टच्या बाहेर आहात, अशी दाद इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत (कौन्सिल जनरल) कोबी शोशानी यांनी दिली.
भारताने लसीकरणात घेतलेली आघाडीही नोंद घेण्याजोगी आहे. कारण १.४ दशलक्ष लोकांना दोनवेळा लस टोचण्याचे आव्हान भारतासमोर आहे. अतिशय नियोजनबद्ध रीतीने लक्ष गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टप्याटप्यात वयोगटानुसार विभागणी केल्याने लसीकरणात सुलभता आली. भारतातील लसीही परिणामकारक असल्याचे बऱ्याच तज्ञांकडून ऐकले आहे. त्यामुळे त्यांच्या वापरास तत्काळ परवानगी देऊन शास्त्रज्ञांच्या कर्तृत्त्वावर विश्वास दाखवणाऱ्या मोदी सरकारचे कौतुक, असे गौरवोद्गार कोबी शोशानी यांनी काढले. त्यांनी बुधवारी (दि.१८) ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
'भारतीय संस्कृतीच्या मी विशेष प्रेमात आहे 'भारत आणि इस्रायलला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दोन्ही देशांत अनेक बाबतीत साम्य दिसून येते. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीच्या मी विशेष प्रेमात आहे. नव्वदच्या दशकातील मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. सी-लिंकसारख्या अनेक पायाभूत प्रकल्पांनी मुंबईच्या सौंदर्यात भर घातलीच आहे, शिवाय विकासासही हातभार लावला आहे, असे ते कौतुकाने म्हणाले.
मी मुंबईत अनेकवेळा आलो आहे. इथली प्रत्येक गोष्ट मला भुरळ पाडते. त्यामुळेच मला जेव्हा वाणिज्य दूत म्हणून क्षेत्र निवड करण्यास सांगण्यात आले, तेव्हा निसंकोचपणे मी मुंबईची निवड केली, असेही कोबी शोशानी यांनी सांगितले. भारतातील युवा वर्ग प्रचंड बुद्धिमान आहे. त्यांच्यात असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.