मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या IL & FS कंपनीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या ईडीच्या तपासातून आणखी एक खुलासा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने 22 ऑगस्ट रोजी चौकशी केली होती. तब्बल साठेआठ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची चौकशी केली. या तपासातून एक समोर आलं आहे की, राज ठाकरेंनी मातोश्री रियल्टर्स कंपनीमध्ये एकही पैशांची गुंतवणूक केली नाही. मात्र 2008 मध्ये त्यांना 20 कोटींचा फायदा झाला.
राज ठाकरेंच्या मातोश्री रियल्टर्स कंपनीची कोहिनूर सीटीएनएल कंपनीत भागीदारी होती. ईडीच्या चौकशीत राज ठाकरेंनी सांगितले की, त्यांनी मातोश्री रियल्टर्स कंपनीत कोणतीही गुंतवणूक केली नाही. मात्र ते मनसे नेता राजन शिरोडकर यांच्या कंपनीच्या 8 पार्टनरपैकी एक आहेत. ही कंपनी केपीपीएल कंपनीची भागीदार आहे. ज्यात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांची कंपनी आहे. केपीपीएलने 2005 नंतर कोहिनूर सीटीएनएल नावाने कंपनी बनविली. यामध्ये केपीपीएलचे 51 टक्के शेअर्स आहेत तर IL & FS चे 49 टक्के शेअर्स आहेत. ज्यांनी कंपनीत 225 कोटींची गुंतवणूक केली होती.
कोहिनूर CTNL एक बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. ती दादर पश्चिम येथे कोहिनूर स्क्वॉयर टॉवरचं निर्माण करत आहे. IL & FS ने आपली भागीदारी फक्त 90 कोटींना विकली. ज्यामुळे या कंपनीला 135 कोटींचे नुकसान झाले. त्याचवेळी राज ठाकरे आणि त्यांची कंपनी मातोश्री रियल्टर्सने त्यांची भागीदारी 80 कोटींना विकला. त्या 80 कोटींमधून राज ठाकरेंना 20 कोटी रुपये फायदा झाला आणि उर्वरित रक्कम मातोश्री रियल्टर्सच्या अन्य पार्टनरला मिळाली.
मातोश्री रियल्टर्स कंपनीने कोहिनूर सीटीएनएलमध्ये 4 कोटी रुपये गुंतवणूक केली. यातील 3 कोटी रूपये सहकारी बँकेकडून तर 1 कोटी रुपये दोन बँक खात्यातून करण्यात आले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री रियल्टर्समध्ये विविध बँक खात्यातून 36 कोटींची गुंतवणूक झाली होती त्यावर संशय असल्याने त्याचा तपास सुरु केला आहे.
राज ठाकरेंना पुन्हा बोलविणार चौकशीला? मातोश्री रियल्टर्स कंपनीने कोहिनूर सीटीएलमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ईडीला संशय असल्याने राजन शिरोडकर, राज ठाकरे आणि उन्मेश जोशी यांची चौकशी सुरु आहे. मात्र चौकशीतून ईडीला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने या व्यवहारातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी राज ठाकरेंना पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.