कोहिनूर हॉस्पिटलला 'स्वच्छ खाजगी रुग्णालय' पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:49 PM2020-01-21T18:49:44+5:302020-01-21T18:50:03+5:30
'स्वास्थ्य सबका' या उपक्रमाला सुरुवात
मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण 2020च्या अहवालानुसार मुंबईमधील कोहिनूर हॉस्पिटलला 'स्वच्छ खाजगी रुग्णालय' /e विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कोहिनूर हॉस्पिटलचे कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल कंसारिया व उपाध्यक्ष अतुल मोडक यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह माजी महापौर स्नेहल आंबेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद व इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
"जेव्हा आपण उपचारासाठी रुग्णालय निवडतो त्यावेळी स्वच्छतेसाठी आग्रही असतो, त्यामुळे रुग्णालय स्वच्छ राखण्यासाठी रुग्णालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा तसेच रुग्ण व रुग्णालयाला भेट देणाऱ्या प्रत्येकाचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो. महानगरपालिकेने केलेल्या सन्मानासाठी संपूर्ण टीमकडून आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच, 'स्वास्थ्य सबका' ह्या उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा यासाठी आवाहन करतो." असे अतुल मोडक यांनी सांगितले.
नेहमीच स्वच्छता, पर्यावरणाचे सरंक्षण आणि संवर्धन या तत्वांचे पालन कोहिनूर हॉस्पिटलने केले आहे. त्यामुळे 'ग्रीन हॉस्पिटल' अशी कोहनूर हॉस्पिटलची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोहिनूर हॉस्पिटलने १० वा वर्धापन दिन साजरा केला आणि आता महानगर पालिकेकडून स्वच्छतेसाठी दुसरे मानाकंन प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोहिनूर हॉस्पिटल दुहेरी आंनद साजरा करत आहे. हा आनंद सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी कोहिनूर हॉस्पिटलने 'स्वास्थ्य सबका' या उपक्रमाला सुरुवात केली आहे.