Video: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:36 PM2019-08-20T21:36:29+5:302019-08-20T21:37:34+5:30
या मिलमधे १९८२ साली संप झाला. त्यावेळी हा संप मुंबईतल्या १३ गिरण्यांमध्ये झाला.
मुंबई - राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्यामुळे कोहिनूर मिल सध्या चर्चेत आहे. १८९६ साली बनात मिल या नावानी ही मिल सुरू झाली. काही वर्ष चालल्यानंतर कापडिया नावाच्या उद्योजकांनी ही मिल विकत घेतली आणि त्याचं नाव कोहिनूर टेक्स्टाईल मिल असं झालं. दादर भागात या तीन मिल आहेत. कोहिनूर मिल नंबर एक, नंबर दोन आणि नंबर तीन या नावांनी या मिल ओळखल्या जाऊ लागल्या. या ठिकाणी सूत कपडा आणि प्रक्रिया अशा तिन्ही गोष्टी चालायच्या. राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही कोहिनूर मिल नंबर ३ ची जमीन विकत घेतल्याबद्दल आहे.
या मिलमधे १९८२ साली संप झाला. त्यावेळी हा संप मुंबईतल्या १३ गिरण्यांमध्ये झाला. संप बराच चिघळला. दरम्यान इंदिरा गांधी यांनी १९८४ च्या सुमाराला या मिलचं राष्ट्रीयकरण केलं, त्या टेक ओव्हर केल्या. पण नंतर या मिल म्हणाव्या तशा चालल्या नाही. ज्यावेळी संप झाला त्यावेळी या मिलमधे ११३५ कामगार होते. २००२ च्या सुमारास या मिलसह २५ गिरण्यांचे प्रस्ताव बीआयएफ आर (बोर्ड ऑफ ईंडस्ट्रीयल फायनान्स अँड रिकन्सस्ट्रक्शन) बोर्डाकडे प्रलंबित होते. त्यातील १५ गिरण्या बंद करायच्या होत्या आणि १० गिरण्या चालू करायच्या होत्या. १५ गिरण्यांच्या यादीत कोहिनूर मिलचाही समावेश होता. पुढे कंपनीत व्हीआरएस लागू झाली.
कामगारांना कंपनी सोडावी लागली. एनटीसीने सात गिरण्या विकल्या. त्यात कोहिनूर मिल ३ चाही समावेश होता. राज ठाकरे, उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री रियाल्टर्स या कंपनीने कोहिनूर विकत घेण्याची बोली लावली. आयएल अँड एफ एस या कंपनीकडून ३०० कोटी रूपयांचे फायनान्स मिळवून कंपनीला कोहिनूरमधील काही समभाग दिले आणि ४२१ कोटी रूपयांचा व्यवहार पूर्ण केला. ज्या वेळी कोहीनूर मिलमधे १९८२ साली संप झाला त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाची युनियन होती. हरीभाऊ नाईक हे कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. आज ते नागपूरात स्थायिक आहेत. मनोहर नरे उपाध्यक्ष होते आणि सचिव होते
कृष्णा डांगे. नरे आणि डांगे आज हयात नाहीत. बजरंग चव्हाण हे देखील त्यावेळी अँक्टीव्ह होते. आज ते मुंबईतच आहेत. कोंबडा छाप धोतर बनवण्यासाठी कोहिनूर मिल प्रसिध्द होती. अन्य प्रकारचे कपडेही ते बनवायचे. मात्र कोंबडा छाप धोतर ही या मिलची ओळख. कोहिनूर मिलचं प्रतिक कोंबडा होता. सकाळी ९ वाजता भोंगा वाजायचा आणि लोक त्यानुसार स्वतःचं घड्याळ लावायचे. इतकी वक्तशीरपणाबाबत ही मिल प्रसिध्द होती. कोहिनूरच्या एक आणि दोन नंबर मिलची एका ट्रस्टने खरेदी केली अशा बातम्या आल्या. पण अजूनही या दोन्ही मिलच्या जागा तशाच आहेत.
गोविंद मोहिते हे या कंपनीत त्यावेळी पीआरओ तथा संपादक म्हणून काम पाहत होते. तेही आज मुंबईत आहेत. शंभर कामगारामागे एक प्रतिनिधी या न्यायानी कंपनीतून कामगार प्रतिनिधी निवडले जायचे. राष्ट्रीय मिल मजदूर संघावर कोहिनूर आणि सेंच्युरी या बड्या गिरण्यांचा प्रभाव होता. तिन शिफ्टमध्ये या गिरण्या चालायच्या. एके काळी धोतर बनवण्यासाठी प्रसिध्द असणारी ही गिरणी स्वतःचे नाव वगळता सगळ्या जुन्या ओळखी हरवून बसली आहे. तिथे गगनचुंबी इमारत तयार होत आहे. त्या इमारतीतून आता सुटा बुटातली साहेब लोकं फिरताना दिसतील.
पाहा व्हिडीओ -