मुंबई - कोकणातील कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने गत वर्षापासून कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुरत्न कलावंत मंचच्या वतीने यंदा ११ ते १६ डिसेंबर दरम्यान कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करतण्यात आला आहे.
कोकण चित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबरला सिंधुदुर्गात महोत्सवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १२ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये उदघाट्न सोहळा आणि चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपटांचे प्रदर्शन संपन्न होईल. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल. या महोत्सवासाठी चित्रपट दाखविण्यास इच्छुक असणाऱ्या चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी २० नोव्हेंबरपर्यंत कोकण चित्रपट महोत्सव या जीमेलवर प्रवेश अर्ज पाठवायचे आहेत.
जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षात सेन्सॉर संमत झालेले मराठी चित्रपट यासाठी पात्र असणार आहेत. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम चित्रपटाची निवड केली जाईल. कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांना चित्रपट माध्यमाशी जोडले जाण्याची संधी मिळते. सिंधुरत्न कलावंत मंच अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांचे म्हणणे आहे.