मुंबई - राज्यातील पूरदुर्घटनेत आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1.35 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दरड कोसळलेल्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी, तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांना धीर दिला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत पुनर्वसन करण्याचं आश्वासनही दिलं. त्यानंतर, मुख्यमंत्री आजच चिपळूण दौऱ्यावर आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोकणच्या भेटीला पोहोचत आहेत.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. यासंह, स्थानिक भाजपा नेते आणि पदाधिकारी घटनास्थळावर उपस्थित राहणार आहेत. कोकणच्या पूरपाहणी दौऱ्यासाठी फडणवीस यांनी मुंबईतून प्रस्थान केलं आहे. यासंदर्भात स्वत: फडणवीस आणि नारायण राणे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला धीर
शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. दरडीखाली गाडल्या गेलेल्या ढिगाऱ्यातून आता कोणी जिवंत बाहेर निघण्याची शक्यता राहिलेली नाही. घटनास्थळावर नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. त्यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनाही शब्द सुचत नव्हते. “तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीषण दरडसंकटात सापडलेल्या नागरिकांना धीर दिला.
मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा
मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे, चिपळूण येथील नागरिकांसाठी मुख्यमंत्री काय मदतीची घोषणा करतील का, त्यांना कशाप्रकारे धीर देतील, हेच पाहावे लागलं.