मुंबई/रत्नागिरी: गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा विराजमान होत असल्याने नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेली कोकणी मंडळी आवर्जून गावी येतात. रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वे सुलभ ठरत असली तरी शहरापासून लांब ग्रामीण भागात, वाडीवस्तीवर राहणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी फायदेशीर ठरत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येतात. गणेशोत्सवासाठी ३,००९ गाड्यांतून मुंबईकर गावी आले होते. परतीसाठी एसटीकडून परतीच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातून एकूण २,५५३ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, गुरुवारी १८७ जादा गाड्या सुटणार आहेत.
गौरी-गणपती विसर्जनानंतर गुरुवारपासून जादा गाड्यांची व्यवस्था रत्नागिरी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ आगारातून बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १२ रोजी ३५ ग्रुप बुकिंग व १५२ वैयक्तिक बुकिंग मिळून एकूण १८७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. १९ सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दैनंदिन एसटीच्या १५० गाड्या मुंबई. बोरीवली, नालासोपारा, पुणे मार्गावर सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंगच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अद्याप बुकिंग सुरू असून, १९ पर्यंत एकूण २,५५३ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.