Join us

Sharad Pawar: 'सह्याद्री'तील दुर्मिळ वनस्पतीला शरद पवारांचं नाव; कशी दिसते 'अजेंरिया शरदचंद्रजी' वनस्पती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:48 PM

Sharad Pawar: कोल्हापुरातील दोन वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेतला आहे

Sharad Pawar: कोल्हापुरातील दोन वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीला त्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही वनस्पती 'अजेंरिया शरदचंद्रजी' (Argyreia Sharadchandrajiया नावानं ओळखली जाणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीला पवारांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. (Kolhapur Botanist Named Sahyadri Mountain Plant After Sharad Pawar As Argyreia Sharadchandraji)

डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्ष गारवेल कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजले गेले आहेत. नवी वनस्पती देखील याच कुळातील असल्याचं शिंपले यांनी सांगितलं. शिंपले यांनी आजवर पाच नव्या गारवेल कुळातील वनस्पतींचा शोध लावला आहे. 

सुप्रिया सुळेंनी केलं ट्विटडॉ. शिंपले आणि डॉ. लावंड यांनी शरद पवारांचा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दोन्ही संशोधकांचे आभार व्यक्त केले आहेत. 

"सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते", असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यासोबतच "महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद", असंही त्या पुढे म्हणाल्या.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे