मुंबई - महाजनादेश, शिवस्वराज्य अशा राजकीय यात्रा भाजपा, राष्ट्रवादीकडून थांबविण्यात आल्यानंतर आता शिवसेनेनेही सर्व राजकीय कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलं आहे. मात्र सत्ताधारी नेत्यांकडून पुरग्रस्त भागाचा दौरा करण्याऐवजी राजकीय कार्यक्रमात यात्रांमध्ये मग्न आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करत कोल्हापूर, सांगलीला येथील पूराची हवाई पाहणी केली.
तसेच शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान कोल्हापूर, सांगली या शहरांना पूराच्या पाण्याने वेढले आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडत आहे. त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी धावून जा, मदत कार्यात झोकून द्या असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्या संपर्कात असून ते पूरग्रस्त नागरिकांना मदत करत आहेत अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
दरम्यान पश्चिम महाराष्ट्राला झोडपणाऱ्या पावसाने मुंबईत मात्र किंचित विश्रांती घेतली आहे. गुरुवारी तुरळक ठिकाणी कोसळलेल्या सरी वगळता पावसाने दिवसभर मुंबईकडे पाठच फिरवली होती. दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी मुंबईत हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.