Join us

‘कोल्हापूर स्कूल’चा लौकिक वृद्धिंगत होईल

By admin | Published: August 21, 2014 12:05 AM

कलाकारांनी व्यक्त केल्या भावना : ‘लोकमत’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन

कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूरला लाभलेल्या चित्र-शिल्प परंपरेचा इतिहास कधी लिहिला गेला नाही. त्यामुळे दर्जेदार कलावंत आणि कलाकृती असतानाही मुंबई स्कूल आणि कोलकाता स्कूलप्रमाणे कोल्हापूर स्कूलचा नावलौकिक सर्वदूर पोहोचू शकला नाही. मात्र, ‘लोकमत’च्या वर्धापनदिन विशेषांकाने या कलापरंपरेचा इतिहास शब्दबद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. हा विशेषांक नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल व कोल्हापूर स्कूलची परंपरा अधिक वृद्धिंगत होईल, असे मत या क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी व्यक्त केले.‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘कोल्हापुरी कला’ या विशेषांकाचे प्रकाशन आज, बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, उदय कुलकर्णी, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, सुनील पंडित, विलास बकरे, धनंजय जाधव, शाहू दूध संघाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक समरजित घाटगे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, चॅनेल बीच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक उपस्थित होत्या. यावेळी श्यामकांत जाधव म्हणाले, कोल्हापूरला चित्र-शिल्प कलेची मोठी परंपरा असली, तरी हा इतिहास फारसा लिहिला गेलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर स्कूल झाकोळले गेले. मात्र, ‘लोकमत’च्या विशेषांकामुळे कलाकारांची पिढी लिहिती झाली आहे. या विशेषांकाचे पुस्तकात रूपांतर झाल्यास ते कैक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. प्राचार्य अजेय दळवी म्हणाले, या विशेषांकामुळे कोल्हापूरच्या चित्र-शिल्पकलेला लाभलेल्या वारशाची नव्याने उजळणी झाली आहे. ‘लोकमत’चे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (रेस) वसंत आवारे, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कलाकारांना मिळावे मानधन यावेळी सुभाष देसाई म्हणाले, दिल्लीमधील अ‍ॅफेक्स गॅलरीच्यावतीने ज्येष्ठ चित्र-शिल्प कलाकारांना दरवर्षी मानधन दिले जाते. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील विविध साखर कारखाने, मोठ्या संस्था व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक संस्था निर्माण करावी व त्याअंतर्गत निधी जमा करून तो कलाकारांना मानधन स्वरूपात द्यावा.‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीच्या दशकपूर्तीनिमित्त काढण्यात आलेल्या ‘कोल्हापुरी कला’ या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयात ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून संपादक वसंत भोसले, सुनील पंडित, विलास बकरे, अजेय दळवी, विजय टिपुगडे, धनंजय जाधव, उदय कुलकर्णी, अरुण नरके, अरुंधती महाडिक, समरजित घाटगे, सुभाष देसाई उपस्थित होते.