लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक करण्यात आली आहे. लुबना वझीर (४७), अनिल चौधरी (४२) आणि मनीष सोदी (४८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तिघेही अंधेरीतील रहिवासी आहे. लुबना ही फॅशन डिझायनर आहे. मनीष आणि अनिल हे सराफ आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील साखरेचे व्यापारी असलेले तक्रारदार व्यवसायानिमित्त २०१६ मध्ये गोवा येथे गेले. तेथे आरोपी महिलेसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. २०१९ मध्ये संबंधित व्यावसायिक कामानिमित्त मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असताना, लुबना हिने मैत्रिणीसह सोबत जेवण्याचा आग्रह केला. दोघीही त्यांच्या रूममध्ये पोहोचल्या.
गप्पा, जेवण उरकल्यानंतर कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने एक जण बाहेर लॉबीमध्ये गेली. थोड्या वेळाने ती महिला परतली म्हणून ते दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे गेले. संबंधित महिलेने तेथेच बोलण्यात गुंतवून थांबवले. पुढे काही समजण्याच्या आतच अचानक कपडे बदलून टॉवेल गुंडाळून बसलेल्या महिलेने धमकावत व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. पुढे हेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मार्च २०१९ ते आतापर्यंत ३ कोटी २६ लाख रुपये उकळले.
पुढे आणखीन पैशांची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्यानुसार कक्ष १० ने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. १८ नोव्हेंबर रोजी आरोपींनी आणखीन १७ लाखांची मागणी केली. पैसे घेऊन अंधेरीतील एका कॉफी शॉपमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे व्यापारी पैसे घेऊन तेथे पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली आहे. यात तिघांना अटक करण्यात आली असून, पसार महिलेचा शोध सुरू आहे.