कृती समिती ठाम : पोलीस अधीक्षकांची विनंती धुडकावली कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना भूमीपूजन समारंभास मंगळवारी (दि.२६) कोल्हापूरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यानी प्रथम कोल्हापुरातील टोल रद्द करावा, मगच येथे यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीने पुकारलेला ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा समितीने आज, शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला.कसबा बावडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉ. शर्मा यांनी ‘कोल्हापूर बंद’च्या पार्श्वभूमीवर दुपारी बैठक बोलविली होती. यावेळी डॉ. शर्मा यांनी टोल समितीची मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी मंगळवारी अर्धातास बैठक अथवा चर्चा घडवून आणू, अशी विनंती समितीला केली. पण, ही विनंती धुडकावत हा बंद मागे घेणार नाही. कारण चारवेळा मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर चर्चा होऊनही त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नियोजित ‘कोल्हापूर बंद’ हा होणारच, असा आक्रमक पवित्रा घेतला. पण, बंद दिवशी कृती समितीतील कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने कोणतीही वर्तणूक अथवा कृत्य करणार नाहीत. हा बंद शांततेत पाळू, अशी ग्वाही समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी यावेळी डॉ. शर्मा यांना दिली.बैठकीत निवास साळोखे यांनी बंदचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी टोल रद्द करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री चव्हाण यांना निर्णय घेण्यास सांगू असे सांगितले होते. पण, यावर अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, टोल रद्दची अधिसूचना त्यांनी काढावी. यावर डॉ. शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर एका कार्यक्रमात शाई फेकण्याचा प्रकार झाला होता. असा संदर्भ देत आता आचारसंहिता आठ-दहा दिवसांवर आली आहे. यामुळे संघर्षाचे कारण होऊ नये. बंददिवशी अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही पक्षांकडून होण्याची शक्यता आहे. यासाठी कृती समितीने बंद मागे घ्यावा, अशी विनंती करत मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबरोबर या प्रश्नी समितीने अर्धातास बैठक घ्यावी, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. पण, समितीने बंद मागे न घेण्याचा निर्णय यावेळी घेतला.बैठकीस बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, दीपा पाटील, बाबासाहेब पाटील (भुयेकर) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही स्थीतीत मंगळवारी कोल्हापूर बंदच
By admin | Published: August 22, 2014 11:28 PM