मुंबई - कोळी समाजाला कोणतेही भवन नसल्यामुळे संपूर्ण कोळी बांधवांसाठी मुंबईत कोळी भवन बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. तसेच त्यांच्या हस्ते मुंबईतील कोळी मच्छिमार महिलांना मासे ठेवण्यासाठी शीतपेट्यांचे वाटप देखिल करण्यात आले. कोळी महासंघ व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने कोळी मच्छिमार महिलांना शीतपेट्या वाटण्याचा कार्यक्रम नुकताच किंगसर्कल येथील ष्णमुखानंद येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शीतपेट्यांमुळे मासे विक्री करणाऱ्या महिलांना मासे विक्री करिता एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कोळी मच्छिमार बांधवांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय ग्रामविकासमंत्री साध्वी निरंजन ज्योती ,महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जम्मू-काश्मीरचे उपमुख्मंत्री कविंदर गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सर्व उपस्थित मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.“कोल्हापूर व सांगली दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहयता निधीला ११ लाखांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करून आम्ही विधानपरिषदेवरती कोळी समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीची निवड केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपले राज्य सरकार कोळी समाजाच्या व आ.रमेशदादा पाटील यांच्या पाठीशी आहे असे सागितले. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा.साध्वी निरंजन ज्योती यांनी आमदार.रमेश पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमदार रमेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करून कोळी समाजाचे अनेक प्रश्न मंत्री महोदयासमोर मांडले. यामध्ये डी.सी.आर. ,सिमांकन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील मच्छीमार्केटचे रिडेव्हलपमेंट, मच्छिमार महिलांना परवाने मिळविण्याबाबत, फिश आँन व्हील, शँक्स आँन बीच, छत्रपती शिवाजी मंडई अशा प्रश्नांचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, आमदार प्रसाद लाड, उद्योजक विशाल पाटील, माजी नगरसेवक तानाजी पाटील,प्रकाश बोबडी,राजहंस टपके,रामकृष्ण केणी,देवानंद भोईर,किरण कोळी, मा.रामदास मेहर, सचिन पागधरे,रेखा पागधरे, प्रतिभा वैती,विरेंद्र मांगेला,राजेश्री भानजी तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी व कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोळी महासंघाचे युवानेते अँड.चेतन पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.