Join us

नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज; १ ऑगस्ट रोजी बंदी उठणार 

By मनोहर कुंभेजकर | Published: July 28, 2024 10:13 PM

नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज झाल्याचे मुंबईच्या विविध कोळीवाड्यातील चित्र आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई: राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने दि,१ जून ते दि,३१ जुलै पर्यंत मासेमारी बंदी घातली होती. आता दि, १ ऑगस्ट रोजी ही बंदी उठणार असून मासेमारीच्या नव्या मोसमाला सुरुवात होणार आहे.

पश्चिम किनारपट्टी या पावसाळी कालखंडामध्ये  होणारी वादळे तसेच  मासेमारी बंदीमुळे मत्स्यसंवर्धन होते. गेली दोन महिने विश्रांती घेणारे कोळी बांधव व कोळी महिला आपल्या कुटुंबासह राज्यात व परराज्यात गेलेल्या पर्यंटन स्थळ आणि देवदर्शनावरून आपल्या घरी परतले आहे आणि नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज झाल्याचे मुंबईच्या विविध कोळीवाड्यातील चित्र आहे.

वेसावे,मढ,भाटी,मालवणी,मनोरी,गोराई,कुलाबा,वरळी,माहीं म,जुहू,माहुल या मुंबईतील प्रमुख विविध कोळीवाड्यांमध्ये मासेमारीच्या नव्या मोसमाची लगबग सुरू झाली आहे. येथील बंदरात बोटींची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे.

मासेमारी बंदी कालावधित होणारी मासेमारी  आणि एल .ईडी पद्धतीची बेकायदेशीर मासेमारी यामुळे समुद्रीय जैविक साखळी उद्धवस्त होत असताना शासन त्याच्यावर कारवाई करत नाही. माशांची पैदास होत नाही त्यामुळे दि, १ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामात आपल्याला भरपूर मासे मिळतील का, असा संभ्रम मच्छीमारांच्या मनात आहे .

नियमा प्रमाणे दि, १ ऑगस्ट पासून मासेमारी सुरु होणार असली तरी, मच्छीमारांच्या मनात संदिग्धता आहे, असं मत मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी व्यक्त केलं.

जून महिना संपूर्ण कोरडा गेल्या नंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली.  उशिराने सुरु होणारा पाऊस अजून पडतो आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा आणि समुद्रात लाटांचे तांडव अजून सुरूच आहे. परिणामी  दहा- पंधरा दिवस उशिराने मासेमारीसाठी निघण्याची बहुतांश मच्छीमारांची धारणा आहे. यंदा शेतीची कामे उशिराने सुरु झाल्यामुळे मच्छीमारी बोटीवर  काम करण्याकरिता येणारा खलाशी वर्गही अजून उपलब्ध झालेला नाही. तसेच मासेमारी करिता जाण्याअगोदर बोटींना  लागणारे डिझेल, बर्फ, मासेमारी जाळी व इतर मच्छीमारी साधनां करिता  लागणारे फार मोठे आर्थिक भांडवल आणायचे कुठून हा फार मोठा प्रश्न मच्छीमारांना सोडवायचा आहे, असंही कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :मुंबई