पालिकेतील मतदारसंघ भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याची काेळी समाजाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:24 PM2024-10-07T12:24:45+5:302024-10-07T12:25:41+5:30
कोळी समाज मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे. कोळी समाजाने मुंबईच्या विकासासाठी त्यांच्या उपजीविकेची नैसर्गिक साधने अर्पित केली आहेत.
मुंबई :
कोळी समाज मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे. कोळी समाजाने मुंबईच्या विकासासाठी त्यांच्या उपजीविकेची नैसर्गिक साधने अर्पित केली आहेत. मात्र, निर्णय प्रक्रियेमध्ये भूमिपुत्रांना डावलले जाते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोळीवाडेनिहाय मतदारसंघ सामाजासाठी राखून ठेवावे, अशी मागणी ग्रामदैवत मुंबादेवीच्या सामूहिक दर्शनावेळी कोळी समाजाने केली.
मुंबादेवी देवस्थान कोळी समाजाचे कुलदैवत आहे. मुंबईमध्ये आता २७ कोळीवाडे शिल्लक आहेत. समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
लक्ष्मीनारायण मंदिर येथून मुंबादेवीपर्यंत कोळी समाजाची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, भाजप मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर, प्रा. अभय पाटील, अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष केदार लखेपुरिया, माजी नगरसेविका रजनी केणी, भगवान भानजी तसेच कोळी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.