मनोहर कुंभेजकर
मुंबई : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागान मुंबईतील कोळीवाडा सिमांकण करण्याकरिता समिती गठीत केली होती. तसेच माजी महसूल व माजी वन विभाग मंत्री यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत केलेल्या सूचनेनुसार समिती सदस्य सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मच्छिमार यांना सोबत घेऊन सीमांकन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगरचे सीमांकन झालेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून नगर विकास विभागाद्वारे मुबंई उपनगरातील १३ कोळीवाड्यांच्या सीमा अंतिम केलेले नकाशे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अग्रेषीत करून १३ कोळीवाड्यांच्या सीमा विकास आराखडा २०३४च्या नकाशावर दर्शविले आहेत. सदर संकेत स्थळावरील नकाशे पाहता कोळी समाजाची फसगत झाली असल्याची टिका महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे.
पालिकेचे प्रमुख अभियंता ( विकास नियोजन) यांना पाठवलेल्या निवेदनात समितीने आपल्या आक्षेप व हरकती नोंदवल्या आहेत. महापालिकेचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय मुंबई शहर व मुंबई उपनगर कार्यालयातील परवाने अधिकारी यांना सोबत स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच स्थानिक सीमांकन करताना सोबत होते. सीमांकन पूर्ण झाल्यावर त्यांच्या व परवाने अधिकारी यांच्या सह्या घेतल्या होत्या. परंतू कोळीवाड्यांच्या सीमा अंतिम करताना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय मुंबई शहर व मुंबई उपनगर कार्यालयातील परवाने अधिकारी तसेच मच्छिमारांना नकाशे दाखवून सह्या का घेतल्या नाहीत.? असा सवाल समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी केला आहे.
विस्तारित कोळीवाडे, मासळी सुकवण्याच्या जागा, मत्स्यव्यसायातील जागा, मासेमारी जेट्टया/धक्के, नौका लावण्याच्या जागा इत्यादी मत्स्यव्यसायातील जागा मुंबई विकास आराखडा २०३४ मध्ये समाविष्ट केलेल्या दिसत नाही, मुंबई कोळीवाड्यांकरिता राहती घरे दुरूस्ती बाबत व मच्छिमारांच्या खुल्या जमिनीवर घरे बांधकामाची नियमावली ( डीसीआर) बाबत अवलोकन होत नाही असे किरण कोळी यांनी सांगितले.
वरील व अनेक आक्षेप हरकतीवर नगर भूमापन अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय मुंबई शहर व मुंबई उपनगर तसेच उपनगरातील स्थानिक १३ कोळीवाड्यातील मच्छिमार प्रतिनिधी, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती पदाधिकारी यांना संगणका मार्फत सिक्रनवर त्या त्या कोळीवाड्याचे जन सादरीकरण करून प्रत्यक्ष सीमांकन केलेल्या जुन्या व नविन नकाशांवर आहेत किंवा नाहीत. ते दाखविणे तसेच वरील आक्षेप, हरकती सादरीकरण संदर्भात पालिका सभागृहात दुरूस्ती करावी. अशी मागणी लिओ कोलासो किरण कोळी यांनी शेवटी केली आहे.