लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. येथील आपदग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी आर्थिक मदतीचा धनादेश व धान्यवाटप करून दिलासा दिला.
आमदार रमेश पाटील यांनी २८ मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानाची पाहणी केली. यावेळी तेथील मच्छिमार बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. हरबादेवी मंदिराच्या पटांगणात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात आमदार रमेश पाटील यांच्या वतीने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्या हस्ते बोट मालकांना धनादेश व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
सरकारने मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना त्यांना अपुरी मदत करून निराश करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ४० ते ५० लाख रुपये किंमत असलेल्या बोटींसाठी मालकांना २० ते २५ हजारांची मदत करून कोळी समाजाची सरकारने चेष्टा केली आहे, असा आरोप आमदार रमेश पाटील यांनी केला.
या बांधवांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले त्याप्रमाणे मढ कोळीवाडा येथील नुकसान झालेल्या सर्व बोटधारकांना आर्थिक साहाय्य करून मच्छिमार बांधवांना धान्य वाटप केले, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ज्या बोट मालकाच्या बोटीचे नुकसान झाले आहे, अशा बोट मालकांना मुंबई जिल्हा बँकेकडून बिनव्याजी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी मच्छिमार बांधवांना सांगितले. तसेच मच्छिमारांचा डिझेल परतावा सरकारने ठराविक दिवसात मच्छिमारांना देण्याबाबत कायदा बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. मच्छिमार बांधवांना सरकारने मदत केली नाही किंवा त्यांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा सरकारला त्यांनी दिला. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री या विभागाचे प्रतिनिधी असताना त्यांनी मच्छिमारांना योग्य मदत जाहीर करणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याचे सांगून मी मंत्री असतो तर प्रत्येक मच्छिमाराला एक लाख रुपये मदत जाहीर केली असती, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
विजय गिरकर यांनी मच्छिमारांना सरकारने तुटपुंजी मदत न करता योग्य मदत केली पाहिजे व ही मदत मिळविण्यासाठी आम्ही सभागृहात सरकारला धारेवर धरू, असे सांगून आमदार रमेश पाटील यांनी मच्छिमारांना जी मदत केली याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छिमार नेते किरण कोळी, राजेश्री भानजी, महाराष्ट्र भाजप मच्छिमार सेलचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील तसेच भाजप व कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी, मढ ग्रामस्थ, कोळी महिला उपस्थित होत्या.
-------------------------------