मुंबई : मुंबईतील माहीम कोळीवाडा व खारदांडा कोळीवाड्यातील तौक्ते वादळातील आपद्ग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाकडून आर्थिक मदत व अन्न-धान्याचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. येथील ज्या मच्छीमार बांधवांच्या बोटी नष्ट झालेल्या आहेत, अशा बोट मालकांना कोळी महासंघ व आमदार रमेश पाटील यांनी माजी शिक्षणमंत्री ॲड. अशिष शेलार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करून आर्थिक सहाय्य केले.
कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत असून, राज्यपालांना आम्ही याबाबतचे निवेदन देऊन मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानाची माहिती दिली व मच्छिमारांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत करण्यास सांगितले असल्याचे आमदार रमेशदादा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
निसर्ग चक्रीवादळावेळीही मच्छिमारांना सरकारने मदत केलेली नसून, सरकार मच्छिमारांना फक्त आश्वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असा आरोप आमदार रमेश पाटील यांनी केला.
कित्येक वर्षांपासून राज्यातील मच्छिमारांचा डिझेल परतावा सरकारकडे प्रलंबित आहे. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात सापडला आहे. ऐन मोसमाच्या काळात झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार देशोधडीला लागलेला असताना, सरकार मच्छिमारांना कोणतीही मदत करत नसल्याचे आमदार रमेशदादा म्हणाले. कोळी महासंघाने किनारपट्टीवरील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी मच्छिमारांचे नुकसान झाल्याचे आढळल्याने या मच्छीमार बांधवांना धनादेश व धान्य वाटप केल्याची माहिती ॲड. चेतन पाटील यांनी दिली.
----------------------*--------------