Join us

मुंबई, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोळी समाज बांधव देणार उमेदवार

By मनोहर कुंभेजकर | Published: October 30, 2023 2:57 PM

पदवीधर निवडणुकीचे पडघम वाजयला सुरवात झाली आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - पदवीधर निवडणुकीचे पडघम वाजयला सुरवात झाली आहे. सध्या पदवीधरांचे मतदार नोंदणी अर्ज भरण्यासाठी  उबाटा,शिवसेना शिंदे गट यांन कंबर कसली आहे. तर आता मुंबई, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी सज्ज झाला आहे.

मच्छिमार समाजाला हक्काचा आमदार देण्यासाठी कोळी समाजाचे तरुण वर्गाने पुढाकार घेतला असून कोळी उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदार संघ निर्माण करण्याचा सामाजिक आणि राजकीय प्रयोग त्यांनी हाती घेतला आहे. कफपरेड, कुलाबा आणि माहीम, वरळी, वर्सोवा, खार दांडा, मढ, गोराई आणि अन्य कोळीवाड्यातून मुंबई पदवीधर मतदार संघामध्ये पदवीधरांची नोंदणी करण्याची मोहीम सुरू झाल्याची माहिती मच्छीमारांनी लोकमतला दिली.

कोळी समाजाचा हक्काचं मतदार संघ नसल्याने राज्यातील मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले आहे. मच्छिमार समाजाला आपल्या व्यवसाय वाचविण्यासाठी तसेच कोळीवाडे मालकी हक्कावर करण्यासाठी अधिवेशनामध्ये आपली बाजू मांडणारा आमदार नसल्याने समाजाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत युवा मच्छिमार नेते देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केली.

येत्या मे-जून मध्ये होणाऱ्या मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघात हा प्रयोग मच्छिमार तरुण वर्गाकडून होत असून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विरोधात एकजूट झालेले तरुण मोठ्या संख्यने पदवीधर नोंदणी सुरू केली आहे. तसेच रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अवैध मासेमारीमुळे मच्छीमारांचे नुकसान होत असून या मुद्द्यावरून तरुण वर्ग एकजूट झाला असून नोंदणी प्रक्रियेत सहभाग दर्शिवत आहे तसेच ठाणे आणि रत्नागिरी मध्ये कोळीवाड्यांच्या जमिनी मालकी हक्कावर होण्यासाठी नोंदणी मोहिमेत सक्रिय झाले आहेत. एकंदरीत मच्छिमारांची युवा शक्ती आपला मताधिकार बजावून सामाजिक आणि राजकीय बदल घडविण्याच्या प्रयत्न करत असल्याने कोळीवाड्यात सर्वत्र कौतुक होऊ लागल्याचे तांडेल यांनी सांगितले.

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी सर्व क्षेत्रामधील पदवी प्राप्त केलेल्या पदवीधर व्यक्तींनी १.११.२०२० पूर्वी ज्यांचे पदवीधर/ पदवी शिक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व व्यक्ती यात मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात. कोंकण आणि मुंबई विभागाची पदवीधर मतदारसंघातील मतदार नाव नोंदणी मोहिम दि, ३० सप्टेंबर ते दि,६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होत आहे. यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक असंल्याचे तांडेल यांनी सांगितले.