मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क: मुंबई-मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर असून येथील कोळी समाज हा मुंबईचा भूमीपूत्र आहे.त्यांचा मासळी विक्रीचा व्यवसाय आहे.मात्र यामध्ये कोळी समाजाचा मासे निर्यातीत वाटा किती आहे असा सवाल केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वेसावा कोळी महिला सामाजिक संस्थेच्या उपस्थित कोळी महिलांना व बांधवांना आज सायंकाळी वर्सोव्यात केला. मुंबईच्या भूमिपुत्र कोळी मासळी महिलांच्या वतीने तीन दिवसीय मुंबई कोळी सी फूड फेस्टिवल २०२३ चे वेसावा कोळी महिला सामाजिक संस्थेने आयोजन केले होते. आज रात्री उशिरा वर्सोवा वेल्फेअर शाळेचे मैदान, ओल्ड फिशरीज रोड,आराम नगर नंबर १,सात बंगला, अंधेरी पश्चिम येथे उशिरा सांगता होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की,माझ्या केंद्रीय लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योग खात्यात ७ कोटी ३० लाख उद्योग असून निर्यात ४९ ते ५० टक्के आहे.मात्र यामध्ये कोळी समाजाचा मासे निर्यातीत वाटा किती आहे असा सवाल त्यांनी वेसावा कोळी महिला सामाजिक संस्थेच्या उपस्थित कोळी महिलांना व बांधवांना केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ वर सत्तेवर आल्यानंतर आज जगात निर्यातीत आपला भारत देश पाचव्या स्थानावर आला. पंतप्रधानांच्या मते चायना, जपान नंतर २०३० मध्ये जगात निर्यातीत आपण तिसऱ्या स्थानावर जावू.याचा फायदा कोळी समाजाने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
बँडच्या निनादात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी निलम राणे यांचे या संस्थेने जोरदार स्वागत केले.यावेळी कोळी महिलांनी तर स्टेजवर नृत्य केले. तरवेसावा कोळी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व मुंबई कोळी सी फूड फेस्टिवलच्या स्वागताध्यक्ष शारदा प्रताप पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देवून स्वागत केले .यावेळी या महोत्सवाची संकल्पना राबवून कोळी महिलांना बाजारपेठ मिळवून देणारे दर्शन लाकडे, राजहंस टपके,विशाल पाटील आणि वेसावा कोळी महिला सामाजिक संस्थेच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.