मुंबई: मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न घेऊन कोळी महिलांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सोमवारी भेट घेतली होती. राज ठाकरे हे स्वत: कृष्णकुंजबाहेर आले आणि महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
परप्रांतीय मासेमारांच्या मुजोरीमुळे आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे, असं गाऱ्हाणं या महिलांनी मांडलं. त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडं केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी कोळी भगिनींची तक्रार ऐकून घेतली व हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर मनसेच्या स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासांतच बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला आहे. याबाबतची माहित मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
दरम्यान, मनसेकडे सत्ता नसतानाही कोरोना संकट काळात आपले विविध प्रश्न घेऊन आतापर्यंत अनेक संघटनेच्या लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या होत्या. तसेच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे व प्रसंगी आंदोलन करण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले होते.