मुंबईचे कोळीवाडे होळीसाठी सज्ज
By मनोहर कुंभेजकर | Published: March 5, 2023 03:47 PM2023-03-05T15:47:06+5:302023-03-05T15:52:02+5:30
निसर्गाशी आपलं नातं असलेल्या कोळी जमात निसर्गाच्या नियमांशी एकात्मता होऊन आपले जीवन जगत असण्याचे एक उदहारण म्हणजे होळी.
मुंबई - हिंदूं धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि प्राचीन काळापासून साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. हिंदू धर्मातील प्रत्येक सणांचे वैशिष्ट्य हे निसर्गाशी असलेल्या नात्यांची ग्वाही देणारे असते सूर्य जेव्हा उत्तरायण (उत्तर दिशेकडे प्रस्थान) केले जाते तो दिवस मकर संक्राती म्हणून साजरा केला जाते. त्याच प्रमाणे वसंत ऋतूचे स्वागत हे होळी सणाच्या माध्यमातून केले जाते. या सणाला एक नवीन सुरुवात म्हणून देखील पाहिले जाते. या सणात सर्व हिंदू बांधव एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रतीकात्मकपणे सर्व वाईट सवयी जाळून टाकण्यासाठी आणि रंगीबेरंगी आणि दोलायमान नवीन भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी होलिका दहनाची प्रथा पार पाडली जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी सत्तेवर येताच राज्यातील कोविडचे निर्बंध मुक्त केले आणि तर आता राज्यात कोविड हद्दपार झाला आहे.त्यामुळे यंदा हावलीचा सण उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी मुंबईचे कोळीवाडे सज्ज झाले आहेत. मुंबई तील वेसावे,मढ,भाटी,मनोरी,मालवणी,गोराई कुलाबा,मच्छिमार नगर कफपरेड, वरळी,माहीम,धारावी, ट्रॉम्बवे,माहुल या विविध कोळीवाड्यांमध्ये हावली साजरी करण्याची आगळी वेगळी परंपरा आहे अशी माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांनी दिली.
निसर्गाशी आपलं नातं असलेल्या कोळी जमात निसर्गाच्या नियमांशी एकात्मता होऊन आपले जीवन जगत असण्याचे एक उदहारण म्हणजे होळी. या सणाच्या वैशिष्ट अंमलात घेऊन कष्टाळू कोळी बांधव व्यक्तिक स्वरूपात जगण्याची प्रथा म्हणजे होळी. आयुष्य निरोगी, निर्व्यसनी आणि सुखमय करण्याची प्रथा म्हणजे होळी. होळी सणाच्या माध्यमातून आपले वैर विसरून समाज बांधिलकी जोपणारी प्रथा म्हणजे होळी. म्हणूनच तर कोळीवाड्यात शिमग्याच्या दिवशी गुंजणारा आवाज म्हणजे "हावली रे हावली रे होळी आमची रे होळी"
महाराष्ट्रातील प्रत्येक कोळीवाड्यात हि प्रथा मोठ्या थाटात, उत्सहात आणि आनंदात साजरी केली जाते. प्राचीन काळापासून कोळी जमाती मध्ये “नारळी पौर्णिमा” आणि “होळी” या दोन सणांना अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. नारळी पोर्णिमे पासून मच्छिमार बांधव आपल्या व्यवसायाची सुरुवात करत असतात आपल्या मासेमारी व्यवसाच्या सुफल्य प्राप्त व्हावं म्हणून सागर (जल) देवताला साकडं घालून आराधना केली जाते. त्याच प्रमाणे होळी सणांमध्ये मानवाच्या मनातले द्वेष, स्वार्थ, लोभ ह्याचे दहन करण्यासाठी आणि सात्विक व निरोगी जीवन जगण्यासाठी होळी जाळून हि प्रथा साजरी केली जाते अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.
वेसावे गावातील शिमगा हा एकदम आगळा वेगळा व पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. येथे आठ ते नऊ गल्लीत होळी धूम धडाक्यात साजरी केली जाते व गल्लीतील अध्यक्ष-उपाध्यक्ष अथवा पाटील हावली मातेला रात्री अग्नी देतो व कोळी बांधव आनंद साजरा करतात. वेसावे कोळीवाड्यातील होळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील बाजार गल्ली कोळी जमात संस्था व मांडवी गल्ली कोळी जमात संस्था या दोन गल्लीतील मटकी मिरवणूक. या मिरवणुकीत या दोन गल्लीतील कोळी महिला परंपारिक कोळी वेशभूषा करून माथ्यावर रंगीत फुला पानांनी सजलेली मडकी घेऊन बँड बाज्याच्या ठेक्यावर मिरवणुकीत सहभागी होतात. तसेच लहान मोठे पुरुष काही मंडळी हे विविध सोंग घेऊन - फॅन्सी ड्रेस करून लोकांचे मनोरंजन करतात अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे व मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष विकास बाजीराव यांनी दिली.
कोळी संस्कृती नागरिकां समोर यावी व भावी काळात नष्ट होणारी कोळी भाषा जतन व्हावी म्हणून "वेसावचा शिमगा - कोळीवाडा कल्चर टुरिझम वॉक" याचे आयोजन त्यांनी केले आहे. अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ ह्यांच्या माध्यमातून मुंबईकर फोलक्स हे यु ट्युब व इंस्टाग्राम पेज चालवणारे वेसावे गावातील मोहित रामले यांनी ही माहिती दिली. जेणेकरून विविध अभ्यासक, रसिक, पर्यटक यांना मूळ कोळी जमात परंपरा व बोली भाषा कळेल असा विश्वास रामले यांनी व्यक्त केला.
होळी सणांचे वैशिष्ठ हिंदुस्थानात सर्वोतपरी साम्य असले तरी हा सण साजरा करण्याची प्रथा राज्यातील प्रत्येक कोळीवाड्यात वेगळ्या पद्धतीने साजरी केली जा जात असते. एवढच काय तर मुंबई नगरीतील ९६ कोळी वसाहतीत सुद्धा हि प्रथा भिन्न आणि वेगळ्या उत्सहात साजरी केली जाते. खऱ्या अर्थाने जर होळी सणांचा आनंद घ्याचा असेल तर या ९६ कोळीवाड्याती साजरा करण्यात येणाऱ्या होळी उत्सवाचा अनुभव घेणे हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या "बकेट-लिस्ट" मधली एक बाब असली पाहिजे. वरळी कोळीवाड्यात पोर्तुगीसांच्या अगोदरपासून जी होळी साजरी केली जाते तीच प्रथा आजहि तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. वरळी कोळीवाड्याच्या होळीचे वैशिष्ट म्हणजे इथे दोन वेगळ्या दिसवशी दोन होळ्यांचे दहन केले जातात, एक पाटलांची होळी आणि दुसरी मच्छिमारांची होळी असते अशी माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली.
कफपरेड येथील मच्छिमार नगर कोळीवाड्यात होलिका दहनाच्या दिवशी नवीन दाम्पत्यांची मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये वाजत गाजत या मिरवणुकीत सर्व मच्छिमार कोळी बांधव सामील होतात. नवं वर-वधूंच्या आयुष्यातली पहिली सुरुवात होळी प्रथेनुसार साजरी केली जाते. कोळी बांधव आपल्या नौकांना रंगरंगोटी करून मासेमारी नौकेचे पूजन करता. होलिका दहनाच्या वेळी जळणाऱ्या आगी भवती पारंपरिक कोळी गाणी गाऊन पारंपरिक नृत्य करून आपला सण साजरा करत असतात असे कफपरेड कोळीवाड्यातील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (राजु) तांडेल यांनी ही माहिती दिली.
खार दांडा कोळीवाडा येथील कोळी गीतांचे व संस्कृतीचे अभ्यासक तसेच अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ चे ज्येष्ठ सल्लागार भगवान दांडेकर यांच्या कडे जवळ जवळ १०० हुन अधिक जुन्या नवीन कोळी गीतांचा संग्रह आहे. तर शिमगा - हावली बद्दल बोलताना ते म्हणाले की, कोळी जमातीत हावली - हावलू बाय म्हणजे जणू घरा घरातील एक सदस्यच आहे. अनेक कोळी गीतां मध्ये या सती हावलू बायचा उल्लेख सापडतो.
लाने गो झांजुराचे हावलय झांजुराचे या धारावी येथील गीतकार स्वर्गीय बुधाजी फ्रँसीस कोळी यांच्या मूळ गीतात हावली म्हणजे कोळीवाड्यातील एक वयात आलेली कुमारिका आहे व तिच्या लग्नाची चिंता ही त्याचे बांधवांना लागते व म्हणून तिच्या लग्नाची बातमी हा गावातील मढवी (मरवे) करवी गावात दिंडोरा पिटवला जातो असे रंजक कोळी गीत असल्याचे भगवान दांडेकर म्हणाले. तसेच अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांच्या सहकार्याने आम्ही कोळी बोली भाषा व कोळी संस्कृतीचे नावीन्य रूपाने संवर्धन करणार असल्याचे संघटनेचे सेक्रेटरी भावेश वैती म्हणाले.