मुंबई : मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणे यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्वासात घेऊनच कसे होईल. तसेच कोळीबांधवांच्या घराच्या पुर्नविकासाठी सोपी व स्वतंत्र नियमावली कशी तयार होईल. तर कलेक्टरच्या जागेवरील घरे स्वतःच्या मालकीची करण्याबाबत नवा कायदा लवकरात लवकर तयार व्हावा याबाबत आपण सरकारकडे सतत पाठपुरवा करीत असून सरकार सकारात्मक आहे. यापुढेही आपण पाठपुरवा करीत राहू, अशी ग्वाही मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज येथे दिली.
मुंबईचे मुळ रहिवाशी असणा-या कोळीवाड्यांचा विकास गेली अनेक वर्षे रखडला आहे. या रहिवाशांच्या घरांच्या विकासासाठी अतिरिक्त एफएसआय देण्यात यावा अशी मागणी आशिष शेलार गेली अनेक वर्षे करीत आहेत. तसेच कोळीवाड्यांचे सन 6 जानेवारी 2011 च्या जीआर नुसार डिमार्केशन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी सतत लावून धरली व त्याला अखेर यश आले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही सतत विविध आयुधांच्या माध्यमातून हा प्रश्न त्यांनी मांडला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळीवाडयांचे सिमांकन (डिमार्केशन) केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून करण्यात येईल, असे घोषीत केले आहे. त्यामुळे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी थेट कोळीवाड्यांमध्ये जाऊन जनसंवादाला सुरूवात केली आहे.. शासनाच्या नागपूर अधिवेशनापुर्वी याबाबतची एका सभा त्यांनी खार दांडा येथे घेतली. तर आज वरळी कोळीवाडयामध्ये दुसरी सभा पार पडली. वरळीसह मुंबईतील अन्य भागातील कोळीसमाजासाठी काम करणारे समाजबांधव ही या सभेला मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मुंबईतील झोपडयांच्या पुर्नविकासाला ज्या पध्दतीने चालना देण्यात आली आहे त्याचप्रमाणे याच भाजपा सरकारच्या काळात कोळीवाडे आणि गावठाण्यातील कोळीबांधवाना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून आपण गेली तीन चार वर्षे प्रयत्न करीत आहे. कोळीवाडयांच्या विकासासाठी स्वतंत्र नियमावली करण्यात यावी ती साधी सरळ व सुटसुटीत असावी. कोळीवाडयातील घरांना संरक्षण देण्यात यावे, जर एखाद्याला घराचा पुर्नविकास करायचा नसेल तर त्याला त्याचा ऐतिहासिक वास्तुप्रमाणे टीडीआर मिळायला हवा, कोळी बांधवांच्या मासे सुकविण्याचा मोकळया जागा संरक्षणीत करून त्या त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, तसेच जे कोळीवाडे कलेक्टरच्या जमिनीवर आहेत त्यांच्या सातबारावर स्वतःचे नाव लागले पाहिजे अशी भाजपाची भूमिका असून सरकार याबाबत सकारात्मक आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबत आपण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असून कलेक्टरच्या जागेवरील कोळीवाडयांबाबतचा कायद्यायातील बदल आपण येत्या अधिवेशनात करू असेही त्यांनी आश्वस्त केले आहे असेही आशिष शेलार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला कोळीसमाज संघटनांचे पदाधिकारी उज्वला पाटील, राकेश मांगेला, किरण कोळी, राजाराम पाटील, निलिमा रॉड्रिक्स, शाम भिका यांच्यासह अन्य पदाधिकारी व कोळी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.