कोमसापने स्वीकारला केळुसकर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 05:32 AM2019-08-07T05:32:50+5:302019-08-07T05:32:53+5:30
प्रभारी अध्यक्षपदी अशोक ठाकूर; मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत बिनविरोध निवड
मुंबई : डॉ. महेश केळुसकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २२ एप्रिल २०१९ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर चार महिन्यांनंतर तो कोमसापने स्वीकारला आहे. यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार प्रा. अशोक ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता किर यांच्या अध्यक्षतेखाली ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महेश केळुसकर यांची ९ मे २०१८ रोजी डहाणू येथे झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत केंद्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर वर्षभरातच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
याबाबत केळुसकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. डॉ. महेश केळुसकर यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण आले होते. केळुसकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कोमसापमधील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यात प्रशांत डिंगणकर, वामन पंडित, डॉ. सुरेश जोशी, नीला उपाध्ये, विवेक भावे हे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
महेश केळुसकर यांना कोमसापचा प्रतिष्ठेचा ‘कविता राजधानी’ पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावरून कोमसापमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले होते. संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षपदावरील व्यक्तीला पुरस्कार दिल्याबद्दल एका गटाने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; तर याच संस्थेतील दुसऱ्या गटाने मात्र अध्यक्ष हा कवी असल्याने त्याचा पुरस्कारासाठी विचार योग्य आहे, असे मतप्रदर्शन केले होते. कोमसापच्या विश्वस्तांकडूनदेखील केळुसकर यांच्या पुरस्काराला आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार व पुरस्काराची रक्कम परत केली आहे.
...खरंच ‘मराठीच्या भल्यासाठी’?
मराठीविषयक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्य व सांस्कृतिक संस्था ‘मराठीच्या भल्यासाठी’ अंतर्गत एकत्र आले आहेत.
‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाचे अध्यक्ष असलेल्या मधू मंगेश कर्णिक यांच्याकडे व्यासपीठांतर्गत सुकाणू समिती नेमण्याची जबाबदारी होती. या सुकाणू समितीत सुरुवातीपासून असणाºया सदस्यांना डावलण्यात आले आहे.
समितीतील सुरुवातीपासून असलेल्या या सदस्यांना डावलल्यानंतर कोमसापच्या वतीने नमिता कीर, चंद्रशेखर गोखले, रेखा नार्वेकर आणि रमेश कीर यांची निवड करण्यात आली आहे. ती खरंच मराठीच्या भल्यासाठी आहे का? अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे.
आभारी आहे : राजीनामा स्वीकारल्याबद्दल संस्थेचा आभारी आहे.
- डॉ. महेश केळुसकर, ज्येष्ठ साहित्यिक