कोंडीवलीत तिघांचे पाय तोडले; ८ गंभीर

By admin | Published: January 20, 2015 12:32 AM2015-01-20T00:32:06+5:302015-01-20T00:32:06+5:30

दोन गटांमध्ये राडा : रिक्षा, दुचाकी जाळली; ६५ जणांना अटक

Kondivali breaks legs; 8 serious | कोंडीवलीत तिघांचे पाय तोडले; ८ गंभीर

कोंडीवलीत तिघांचे पाय तोडले; ८ गंभीर

Next

खेड : मुंबईहून आलेल्या साठजणांच्या जमावाने झोपेत असलेल्या घरातील महिलांसह पुरुषांनाही जबर मारहाण केली. एवढेच नव्हे, तर धारदार हत्यारांनी तिघांचे दोनही पाय तोडण्यात आले. यामध्ये १८ जण जखमी झाले असून, गंभीर ८ जणांना रत्नागिरीत हलविण्यात आले आहे, तर दहाजणांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे़.
हल्लेखोरांनी दोन दुचाकी आणि एका रिक्षाचीही जाळपोळ केली, तर दुकानातील सामानही तोडण्यात आले. ही घटना आज, सोमवारी सकाळी तालुक्यातील कोंडीवली शिंदेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ६५ जणांना अटक केली आहे़
खेड तालुक्यातील कोंडीवली शिंदेवाडी येथे राहणारे हनुमंत सखाराम यादव (वय ७०) यांच्या मालकीचा गोठा हा जमीन मोजल्यानंतर आरोपींपैकीकाहींच्या मालकीच्या जमिनीमध्ये आढळल्याने हा गोठा खाली करण्यास सांगण्यात आले होते; मात्र तो खाली न केल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्याचदरम्यान, आणखी एक घटना घडली, सविता गणेश शिंदे, काळुबाई लक्ष्मण उतेकर आणि विद्या शांताराम उतेकर यांना १६ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तेथे राहणारे रवींद्र दगडू शिंदे यांच्यासह अन्य २० जणांनी मारहाण केली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असतानाच आज झालेल्या या राड्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे़ या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी आज सकाळी यादव गटातील ६५ जणांच्या तरुणांच्या टोळक्याने ही जबर मारहाण केली. याबाबतची फिर्याद खेड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.या हल्ल्यात कैलास शिंदे (वय ४०), परशुराम शिंदे (५२), संजय शिंदे (३५), सारिका शिंदे (३२), विनायक चव्हाण (४५), मधूचव्हाण (४२), बळिराम शिंदे (४८), रवींद्र शिंदे (४०) हे आठजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये, तर दहाजणांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुप्तीने वार करण्यात आले असून, कैलास शिंदे, बळिराम शिंदे आणि रवींद्र शिंदे यांचे दोन्ही पाय तुटले आहेत.दरम्यान, हल्लेखोरांमधील आरोपी शांताराम उतेकर हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर याअगोदर चार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते. याशिवाय त्याला तडिपार करण्यात आल्याचे जखमींच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे. हल्लेखोरांमध्ये राजाराम भातोसे, रामचंद्र शिंदे, जनार्दन फालके, संजय यादव, गणेश शिंदे, दिनेश शिंदे यांच्यासह ६५ आरोपींचा सामावेश आहे. त्यांच्यावर जमाव करून मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न आणि अशांतता निर्माण करणे, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक विकास गावडे याप्रकरणी तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
मुंबईच्या तरुणांकडून झोपेतच हल्ला
हल्लेखोर पहाटेच्या कोकण एक्स्प्रेसने कोंडीवली येथे आले होते, तर खेड येथून त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने घेतली आणि ते कोंडीवली गावी पोहोचले.
यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच ही मारहाण झाल्याने सर्वजण भांबावून गेले होते.
काहींवर कोयत्याने आणि गुप्तीने वार करण्यात आले आहेत, तर काहींवर लाकडी बांबूने मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ला सुरू असतानाच हल्लेखोरांनी दुचाकी आणि रिक्षाही जाळली, तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली.

Web Title: Kondivali breaks legs; 8 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.