शहरी सीमेबाहेरील प्रदूषित घटकांमुळेही कोंडला मुंबईचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:51 AM2020-07-12T06:51:12+5:302020-07-12T06:51:38+5:30
केंद्राच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी)मध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांसह देशातील एकूण १०२ शहरांचा समावेश आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : प्रदूषण मुंबईकरांसाठी नवे नाही. वायू, ध्वनिप्रदूषणासोबत जगण्याची जणू मुंबईने सवयच करून घेतली आहे. वर्तमानासह भविष्यातील धोक्याची घंटा लक्षात घेता, प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींसह प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. धक्कादायक म्हणजे केवळ मुंबईतीलच नव्हे तर शहरी सीमांबाहेरील प्रदूषित घटकही मुंबईतील प्रदूषणात भर घालून मुंबईकरांचा श्वास कोंडण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील वायुप्रदूषणातील सुमारे एक तृतियांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील आहे.
केंद्राच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी)मध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांसह देशातील एकूण १०२ शहरांचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, २०२४ पर्यंत प्रदूषक कणांची हवेतील घनता २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी शहरनिहाय प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छ हवेसाठी आराखडे मांडण्यात येत आहेत. असे असतानाच मुंबईतील वायुप्रदूषणातील सुमारे एक तृतियांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील घटकांमुळे होत असल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत शिरकाव करणारे सीमेबाहेरील प्रदूषण रोखणे हे आव्हान आहे. असे असतानाही येथील प्रादेशिक समन्वयासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याची टीका पर्यावरणवाद्यांनी केली आहे.
जानेवारीत मुंबईच्या बहुतांश भागात हवेचा दर्जा वाईट, अतिशय वाईट आणि मध्यम नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीतही सरासरी प्रमाण हेच राहिले. मार्च महिनाही हवेच्या गुणवत्तेच्या दर्जाबाबत निराशाजनकच राहिला. एप्रिलमध्ये मात्र हवेचा दर्जा सुधारू लागला. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ६० इतकी म्हणजेच हवेतील पीएम २.५चे प्रमाण ६० मायक्रो ग्रॅम परमीटर क्यूबपेक्षा कमी असावे लागते. मात्र ते त्यापेक्षा जास्त होते. याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण घटल्याचा दावा केला जात आहे. या काळात चेंबूर, भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरीवली येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला होता.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक कामे वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध आल्याने महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये वायुप्रदूषणात लक्षणीय घट झाली होती. तेव्हा अनुभवलेले स्वच्छ वातावरण इतर वेळेसही असावे याकरिता शहरांसाठी लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्याची लक्ष्ये ठरविणे गरजेचे आहे.
राज्य आणि पालिका अर्थसंकल्पात वायुप्रदूषण कमी करण्यासाठी योग्य तरतूद हवी. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती
- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील वायुप्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- सालभर ६० या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकर हे स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत.
- समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी धोकादायक असून, वाढत्या पातळीमुळे २०५० पर्यंत म्हणजे ३१ वर्षांत अर्धी मुंबई पाण्याखाली जाईल.