Join us

मुंबई-गोवा महामार्गासाठी कोकणवासीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी कोकणवासीय आक्रमक झाले आहेत. १२ वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही. याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी कोकणवासीय आक्रमक झाले आहेत. १२ वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही. याचा निषेध म्हणून कोकणवासीय ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान जनआंदोलन करणार आहेत. ‘समृद्ध कोकण संघटना’ आणि ‘कोकण महामार्ग समन्वय समिती’ने पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, ‘समृद्ध कोकण संघटने’चे संस्थापक संजय यादवराव आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे दीपक परब, पीयूष बोंगीरवार उपस्थित होते.

५ ते ८ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या जनआंदोलनात महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध निदर्शन करत काळी फीत लावून मानवी साखळीच्या माध्यमातून पोलादपूर, चिपळूण, संगमेश्वर, सिंधुदुर्ग, पनवेल आणि पळस्पे येथे सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर म्हणाले की, कोकणच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई- गोवा महामार्ग बनणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी जागा विकत घेऊन तो चार वर्षांत पूर्ण झाला. महाराष्ट्रातील अनेक महामार्गांच्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. त्या-त्या प्रकल्पांमागे राजकीय इच्छाशक्ती दिसते; पण ती कोकण महामार्गासाठी दिसत नाही. ‘समृद्ध कोकण संघटने’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात येत असून गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्यांनी काळ्या फिती लावून, आपल्या गाड्यांना काळे झेंडे लावून या आंदोलानात सहभागी व्हावे.

५ ते ९ सप्टेंबरदरम्यान ‘कोकण महामार्ग जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले असून महामार्गाची दुरवस्था, खड्डे यामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहिली जाईल.

काय आहेत मागण्या?

जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा.

शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी.

अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत.

जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा.

महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये.

डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा.

महामार्गावर विविध झाडे लावत हा देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा.

दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी.