Mhada Lottery 2020 : म्हाडाच्या कोकण मंडळाची ६,१३६ घरांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:52 IST2020-01-04T04:40:52+5:302020-01-04T06:52:19+5:30
Mhada Lottery 2020 : जाहिरात लवकरच; माणकोली-भिवंडी, घणसोली, वसईतील घरांचा समावेश

Mhada Lottery 2020 : म्हाडाच्या कोकण मंडळाची ६,१३६ घरांची लॉटरी
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची भंडार्ली, माणकोली-भिवंडी, घणसोली, वसई या भागांमधील ६,१३६ घरांचा समावेश असलेली लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. यामुळे नव्या वर्षामध्ये घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. खासगी विकासकाकडून म्हाडाला २० टक्के जी घरे मिळाली आहेत, त्यांची किंमत ठरवण्याचे काम सध्या म्हाडामार्फत सुरू असून, हे काम पूर्ण होताच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हाडातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
जुने वर्ष संपताना आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांसाठी प्रत्येक मंडळाकडून किती घरे उपलब्ध होतील, याचा आढावा घेण्यात येतो. मुंबई म्हाडाकडून सामान्यांसाठी २०२० मध्ये फारशी घरे उपलब्ध होणार नसल्याने, मुंबईकरांना २०२२-२३ पर्यंत घरांसाठी वाट पाहावी लागेल.
कोकण मंडळाकडून मात्र सर्वसामान्यांसाठी मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होतील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या कल्याण, शिरढोण, खोणी परिसरात परवडणारी घरे घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मात्र, सुमारे ६,१३६ घरे उपलब्ध होतील, असे म्हाडातील सूत्रांनी दिली. म्हाडाच्या कल्याणमधील शिरढोण येथे पाच हजार, तर खोणी, भंडार्ली येथे एक हजार १३६ घरांची नवीन वर्षात सोडत काढली जाणार आहे. याशिवाय माणकोली-भिवंडी (२७९), घणसोली (४०), वसई (१५) येथील घरेही उपलब्ध झाली असून, ती सोडतीसाठी उपलब्ध असणार आहेत.
मुंबईकरांना २०२२-२३ पर्यंत वाट पाहावी लागणार
सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरे कशी उपलब्ध करून देता येतील, याचा म्हाडा नेहमीच विचार करत असते. २०२० मध्ये सामान्यांसाठी मुंबईत फारशी घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना २०२२-२३ पर्यंत घरांसाठी वाट पाहावी लागणार आहे. सर्वत्र सात ते आठ हजार घरांचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ही घरे सोडतीत घेण्यास म्हाडा तयार नसल्याचे सूत्रांकडून समजले.