Join us

कोकण किनारपट्टी पुढील कित्येक दशके पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखली जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:06 AM

रघुजीराजे आंग्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वसई ते वेंगुर्लापर्यंत पसरलेली कोकण किनारपट्टी जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे अनेक प्रकारचा ...

रघुजीराजे आंग्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वसई ते वेंगुर्लापर्यंत पसरलेली कोकण किनारपट्टी जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे अनेक प्रकारचा रानमेवा मिळतो. त्यामुळे येथे अन्नधान्याची विपुलता आहे. शिवाय येथील खास बंदरे आणि किल्ले यामुळे ही ७२० किमी पसरलेली कोकण किनारपट्टी पुढील कित्येक दशके पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केला. वसई ते वेंगुर्ला असा मोठा विस्तार असलेल्या या भूमीवर मुंबईसारख्या महानगरापासून वेंगुर्ल्यासारख्या लहान खेड्यापर्यंत सगळेच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र पर्यटनाच्या उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग प्रादेशिक कार्यालयातर्फे आयोजित नव्याने कोकण दाखवूया या वेबिनार शृंखलेतील पहिले वेबिनार नुकतेच पार पडले. यावेळी रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी कोकणातील दुर्ग या विषयावर मार्गदर्शन केले.

येथील सगळे किल्ले पाहायला १०४ आठवडे प्रत्येक शनिवार, रविवार येथे यावे लागेल एवढे किल्ले आणि इतर पर्यटनस्थळे येथे आहेत. कोकणात एकूण ६३ किल्ले आहेत. त्यापैकी केवळ १२ ते १५ सुप्रसिद्ध असलेल्या किल्ल्यांना पर्यटक भेट देत आहेत. शिलाहार राजे ते छत्रपती शिवाजी महाराज अशा राज्यकर्त्यांच्या १००० वर्षांच्या परंपरेत हे किल्ले बांधले गेले असल्याने त्यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे.

कुलाबा किल्ल्याची खास तटबंदी तेथील यशवंत दरवाज्याजवळील ड्रायडॉक, सिद्दी जौहरने बांधलेला व आता अवशेषरूपात असलेला उंदेरीचा किल्ला इत्यादींची त्यांनी माहिती दिली. खांदेरी किल्ल्याचे पर्यटनासाठी नूतनीकरण सुरू असून तेथे प्रवेशद्वाराजवळ भव्य खडकातून हंपीच्या सांगीतिक स्तंभांसारखे सांगीतिक नाद ऐकू येतात या वैशिष्ट्याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

.............................