- अजय परचुरेमुंबई : म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीत उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्न गटाची घरे महाग असल्याचे समोर आले आहे. लॉटरीतील मीरा रोडमधील घरांच्या किमतीवरून ही तफावत समोर आली आहे. उच्च उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटातील घराच्या किमतीमध्ये फक्त काही हजार रुपयांचाच फरक म्हाडाने ठेवल्याने, म्हाडाने श्रीमंत वर्गाला दिलासा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड येथे २१ चौरस मीटरचे घर विक्रीसाठी आहे. त्याची किंमत आहे १८ लाख ४६ हजार ५१२ रुपये आहे, तर त्याच मीरा रोडमध्ये उच्च उत्पन्न गटासाठी ३४.९० पासून ३५.३१ चौरस मीटरपर्यंतची घरे विक्रीसाठी आहेत, त्याची किंमत म्हाडाने फक्त १९ लाख १३ हजार ४०५ रुपये ठेवली आहेत. याचा अर्थ म्हाडाने उच्च उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटाच्या एकाच ठिकाणच्या घरांमध्ये फक्त काही हजारांचा फरक ठेवला आहे. म्हाडाने एकीकडे श्रीमंत वर्गाला दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे गरीब वर्गाला दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे.म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटाच्या मीरा रोड सोडून इतर ठिकाणीही अशाच प्रकारे उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या घराच्या किमती अधिक आहेत. या सर्वांचा फटका म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीच्या आॅनलाइन नोंदणीला बसत आहे.
कोकण विभागीय लॉटरी : म्हाडाचा उच्च उत्पन्न गटाला दिलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 2:07 AM