Join us

कोकण विधानपरिषदेच्या जागेवरून भाजपाची माघार; शिवसेना आणि राणेंमध्ये रंगणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 11:45 AM

कोकणची जागा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला देण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

मुंबई: शिवसेना-भाजप यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत असतानाच आता भाजपाकडून एक नवा डाव टाकण्यात आला आहे. कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाने माघार घेतली आहे. यामुळे आता कोकणात शिवसेना विरुद्ध नारायण राणे विरुद्ध तटकरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे. 

कणकवली राणेंचीच! नगराध्यक्षपद आणि 11 जागांवर बाजी मारत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राखले निर्विवाद वर्चस्व

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी राज्यसभेत भाजपाचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून कोकण विधानपरिषदेची जागा राणेंच्या पक्षासाठी सोडण्यात आली आहे. परिणामी मंगळवारी भाजपाने या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. कोकणची जागा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला देण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला चांगले यश मिळवले होते. त्यानंतर आता स्वाभिमानकडून कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीत राणेंना आपल्या ताकदीचा अंदाज घेता येईल. दुसरीकडे या जागेसाठी शिवसेनेकडून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून तटकरे कुटुंबीयांपैकी एका सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :नारायण राणे भाजपानिवडणूक