११ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार 'कोकण चित्रपट महोत्सव'

By संजय घावरे | Published: December 7, 2023 07:27 PM2023-12-07T19:27:19+5:302023-12-07T19:28:08+5:30

रत्नागिरीमध्ये उद्घाटन, तर मालवणमध्ये सांगता सोहळा; विनामूल्य दाखवण्यात येणार चित्रपट

konkan film festival will be held from 11th to 16th december | ११ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार 'कोकण चित्रपट महोत्सव'

११ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार 'कोकण चित्रपट महोत्सव'

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - कोकणचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने कोकणातील कलाकारांना एकाच मंचावर एकत्र आणणाऱ्या कोकण चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे 'सिंधुरत्न कलावंत मंच'चे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्राद्वारे तसेच अभिषेक बच्चन यांनी शब्दांच्या माध्यमातून या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कोकण चित्रपट महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत. ११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोत्सवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार आहे. १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून, १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये भव्य दिव्य बक्षिस समारंभ आणि महोत्सव सांगता सोहळा संपन्न होईल. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील जेणेकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना असल्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. 

कोकणात निसर्गसंपन्नतेसह असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांचे कलागुण जगासमोर यावे आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हा संस्थेचा हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवणार आहेत. संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवात होतील.

Web Title: konkan film festival will be held from 11th to 16th december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा