Join us

कोकणातल्या लोककलांचे सर्वेक्षण

By admin | Published: December 23, 2015 12:40 AM

राज्य शासनातर्फे विविध विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककला, त्यांची वैशिष्ट्ये आणि लोककलावंत यांची माहिती संकलन आणि संशोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे

स्नेहा मोरे,  मुंबईराज्य शासनातर्फे विविध विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककला, त्यांची वैशिष्ट्ये आणि लोककलावंत यांची माहिती संकलन आणि संशोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीकडे कोकणातील लोककलांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वेक्षण प्रकल्पासाठी प्रकल्प मुख्य संयोजकासह १३ जणांची चमू यासाठी काम करत आहे.कुलाबा ते सिंधुदुर्ग या विभागातील सर्व लोककलांचे सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठी लोककला अकादमीचे १० विद्यार्थी, डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. शत्रुघ्न फड, मोनिका ठक्कर या संशोधक मार्गदर्शकांसह आणि मुख्य संयोजक म्हणून डॉ. प्रकाश खांडगे काम पाहत आहेत. सध्या लोककलांवतांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. लोककलांचे सर्वेक्षण करताना प्राथमिक स्तरावर कोकण प्रांतातील दशावतार, नमन खेळे, घुमटाचा फाग, लळीत, शक्तीतुरे, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, ठाकर, राधानाच, कातकरी, चपाई, ढोल नृत्य, तारपा नृत्य, खडीगंमत, लावणी, मादळ, गौरी नाच, डबलबारी भजन, पालखी नृत्य, तांगूळ आणि टाकळा इ. कलांची माहिती संकलित करण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठासोबतच लोककलांच्या सर्वेक्षण प्रकल्पात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांचाही समावेश असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालयनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)